वसई-विरारमधील रखडलेली विकासकामे मार्गी लागणार, आमदार रविंद्र फाटक व एमएमआरडीए आयुक्तांमध्ये चर्चा
मुंबई-ठाणे शहरांपाठोपाठ वसई, नालासोपारा व विरार शहरांचाही विकास मोठ्या प्रमाणात होत असून लोकवस्ती वाढत आहे. परिणामी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहराला जोडणारे मुख्य रस्ते अरुंद पडत आहेत. त्यामुळे नालासोपारा, वसई व विरार येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विरार : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Municipal Corporation) हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गापासून वसई, नालासोपारा, विरार शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, वसई-विरार शहरात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत उपाययोजना व रेल्वे उड्डाण पूल या रखडलेल्या विकासकामा (Development work)करता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी विधान परिषद आमदार रविंद्र फाटक यांनी एमएमआरडीएचे आयुक्त व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे केली. या विकासकामांसंदर्भात रविंद्र फाटक यांनी शुक्रवारी एमएमआरडीएचे आयुक्त माननीय व्ही. आर. श्रीनिवास यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या मागण्यांचे निवेदनही एमएमआरडीएला यावेळी सुपूर्द करण्यात आले. (Discussion between MLA Ravindra Phatak and MMRDA Commissioner regarding development work in Vasai-Virar)
मुंबई-ठाणे शहरांपाठोपाठ वसई, नालासोपारा व विरार शहरांचाही विकास मोठ्या प्रमाणात होत असून लोकवस्ती वाढत आहे. परिणामी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहराला जोडणारे मुख्य रस्ते अरुंद पडत आहेत. त्यामुळे नालासोपारा, वसई व विरार येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाची गजर आमदार रविंद्र फाटक यांनी श्रीनिवास यांच्याकडे व्यक्त केली.
पूरस्थितीमुळे मोठे आर्थिक नुकसान होते
पाण्याच्या नैसर्गिक निचऱ्याच्या मार्गावर झालेल्या अतिक्रमणांमुळे वसई ग्रामीण आणि शहरी भागात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. याकडेही रविंद्र फाटक यांनी एमएमआरडीए आयुक्तांचे लक्ष वेधले. पूरस्थितीमुळे मोठे आर्थिक नुकसान होते. ही स्थिती कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी निरी व आयआयटी या संस्थांनी ‘धारणतलावां`ची आवश्यकता सूचविलेली आहे. त्यानुसार वसई-विरार शहरात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेने 295 कोटींचा प्रस्ताव तयार केलेला आहे. मात्र निधीअभावी या कामांची पूर्तता करण्यात वसई-विरार महापालिकेला अडचणी येत आहेत. त्यामुळे एमएमआरडीएमार्फत या कामांकरता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी विनंती फाटक यांनी श्रीनिवास यांना केली.
रेल्वे उड्डाणपुलाबाबतही सकारात्मक चर्चा
नालासोपारा आचोळे-अलकापुरी येथील रेल्वे उड्डाणपुलाबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रविंद्र फाटक यांनी दिली. हा प्रकल्प मोठ्या खर्चाचा असल्याने या कामाला सुरुवात झालेली नाही. महापालिकेच्या प्रस्तावित रस्त्यांना जोडणारा हा प्रमुख पूल असल्याने शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याकरता मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एमएमआरडीएमार्फत विकसित करणे शक्य असल्याने या पुलाच्या बांधकामास लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी एमएमआरडीएकडे केली असल्याचे आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले. (Discussion between MLA Ravindra Phatak and MMRDA Commissioner regarding development work in Vasai-Virar)
इतर बातम्या
सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून बालविवाह रोखले, पोलिसांची घटनास्थळी धाव, कुटुंबांचे समुपदेशन
प्रतिबंधित बीटी वांग्याची लागवड करून शेतकरी संघटनेचा सत्याग्रह; जीएम वाणांना परवानगी देण्याची मागणी