अकोला | 17 ऑक्टोबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. पुढच्या सहा महिन्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. याशिवाय विरोधकांच्या इंडिया आघाडीत जोरदार तयारी सुरु आहे. असं असताना अकोल्यात काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीय. विशेष म्हणजे ही धुसफूस इतकी वाढली की थेट गाडीतून बंदूक काढेपर्यंत काँग्रेस नेते आमनेसामने आले.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अकोल्यात काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापलं आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरचिटणीस आणि सचिवांमध्ये चांगलीच खडाजंगी झालीय. वाद वाढल्यानंतर थेट बंदूक काढण्याचादेखील प्रयत्न झालाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस सरचिटणीस डॉक्टर अभय पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव मदन भरगड यांच्यात आज चांगलीच खडाजंगी रंगली.
येणाऱ्या लोकसभेमध्ये पॅराशूट उमेदवार उभा करू नका. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे चर्चा सुरु होती. त्यावर आज काँग्रेसने बोलावलेल्या पत्रकार परिषदनंतर काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर अभय पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव मदन भरगड यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
हा वाद इतका टोकाला गेला की डॉक्टर अभय पाटील यांनी त्यांच्या कारमधून थेट बंदूक काढली. यावेळी पत्रकारांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळलं. दरम्यान, या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी बोलणं टाळलं. त्यांनी या प्रकरणावर चुप्पी साधली.