तापमानाचा पारा भडकला, महामार्ग पोलिसांनी प्रवाशांसाठी केली ही युक्ती, प्रवासी सुखावले
भंडारा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर पांढऱ्या ड्रेसमध्ये पोलीस असतात. ते पोलीस कार पाहून चालकांना दंड वसूल करण्याच्या धमक्या देतात. २०० ते ५०० रुपये मिळाले की सोडून देतात.
निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : विदर्भात तापमानाचा पारा ४२ अंशावर गेलाय. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले. दुपारी अंगाची लाहीलाही होते. अशावेळी थंड पाणी हवं असतं. पण, रस्त्यात प्रत्येकाला ते उपलब्ध होणे शक्य नसते. रस्त्यावर उभे असतात, हे महामार्ग पोलीस. महामार्गावरील पोलीस म्हटलं की, त्यांच्याकडे शंकेने पाहिले जाते. कारण कोणत्या वाहन चालकांकडून कसे पैसे उकडायचे, हे त्यांना चांगले माहीत असते. नुकताच एक प्रसंग घडला. भंडारा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर पांढऱ्या ड्रेसमध्ये पोलीस असतात. ते पोलीस कार पाहून चालकांना दंड वसूल करण्याच्या धमक्या देतात. २०० ते ५०० रुपये मिळाले की सोडून देतात.
पेशंटला घेऊन नागपूरला एक कार जात होती. भंडारा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोरील पांढऱ्या ड्रेसमधील पोलिसांनी गाडी अडवली. तुम्हाला सहाचा परवाना आहे सातजण कसे जाता, यावरून चालकाला धारेवर धरले. चालकाकडून दोनशे रुपये प्रसाद मिळाल्यानंतर सोडून दिले. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर असे प्रकार घडतात. इतरत्र काय होत असेल हे वाहनचालकच सांगू शकतील.
वाहन चालकांना प्रेमाचा संदेश
पण, सर्वच पोलीस असे असतात असे नाही. चंद्रपुरात महामार्ग पोलिसांनी अनोखी मोहीम राबविली. चंद्रपूरच्या वाढत्या तापमानात नियमांची जाणीव करून देण्यासाठी सरबत वितरण केले. चंद्रपूर- नागपूर राज्य महामार्गावर महामार्ग पोलिसांच्या पथकाच्या गांधीगिरीच्या कृतीने वाहनचालकही भारावले. महामार्गांवर प्रेमाने सरबत पाजणारे पोलीस बघून वाहनचालकांना प्रेमाचा संदेश दिला गेला.
गांधीगिरीचे पाऊल
चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढली आहे. वाहचालकाकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होतं असल्याने अपघात होत आहेत. त्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी पोलीस विभागाने गांधींगिरीचे पाऊल उचललं आहे. या उपक्रमाबद्दल महामार्ग पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकार यांनी सांगितले.
या पोलिसांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे पोलिसांना वसुली कर्मचारी म्हणून पाहत असले, तरी दुसरीकडे प्रवाशांना दिलासा देण्याचे कामही पोलीस करतात, हेही नसे थोडके.