सांगली : एकीकडे राज्यातील सत्ता संघर्षावरील निर्णय अवघ्या काही तासात लागणार असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीने जयंत पाटील यांना उद्याच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सत्ता संघर्षाचा निकाल आणि जयंत पाटील यांच्या नोटिशीचा टायमिंग एकच झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. आयएल अँड एफएस प्रकरमआत पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. ईडीने पाटील यांना उद्याच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना उद्याच ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, जयंत पाटील यांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचं म्हटलं आहे.
आयएल आणइ एफएस कंपनीच्या व्यवहारांची यापूर्वीच ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातं. ही कंपनी दिवळखोरीत होती. या कंपनीत मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचाही संश आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अरुण कुमार साहा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली होती. याच प्रकरणात आता जयंत पाटील यांना नोटीस बजावली गेल्याचं सांगितलं जात आहे.
जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची नोटीस आली असेल तर जयंत पाटील यांनी बाजू मांडली पाहिजे. ईडीला स्पष्टीकरण दिले पाहिजे. तथ्य नसेल तर घाबरू नये. त्याचा बाऊ करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.