आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केला नाही, राजकारण असंच असतं; नाथाभाऊंचा महाजनांना टोला
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे.
जळगाव: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने यू-टर्न घेतल्यानेच आमची कोंडी झाली, असं महाजन म्हणाले होते. त्यावर, आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही. राजकारण असंच असतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन पैसे लावतील अशी उमेदवारांना आशा होती. पण त्यांचा नाऊमेद झाला आहे. उमेदवार मात्र त्यांनी दहा कोटी लावले तर मी वीस कोटी लावेल, नाथाभाऊ बसला आहे, तुम्ही फक्त लढा असे म्हणत मी नाउमेद असणाऱ्यांना जिल्हा बँक निवडणूक लढायला लावली, असं खडसे म्हणाले.
शब्द खरा करून दाखवला
ऐन निवडणुकीच्या काळात मी दवाखान्यात होतो. त्यावेळी भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा शब्द मी दिला होता. आम्ही योग्य वेळी आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यानंतर विजयही मिळवला आणि शब्द खरा करून दाखवला, असंही त्यांनी सांगितलं.
म्हणून महापौर बदलला
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप केला होता. जिल्हा निवडणूक बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून दोन बैठका झाल्या. या बैठका यशस्वीही झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या यू-टर्नमुळे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही महाजन यांनी केला होता. त्यालाही खडसे यांनी उत्तर दिलं. राजकारण हे असच असतं. आम्ही काही धर्मार्थ दवाखाने नाही चालवत, असा टोल लगावतानाच जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांनी 21 उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली असती का? असा सवालही त्यांनी केला. जळगाव महानगर पालिकेत नाथाभाऊने धक्का दिला म्हणून तिथे महापौर बदलला, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Video | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 27 November 2021#News | #NewsUpdate https://t.co/yxbBATunyo
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2021
संबंधित बातम्या:
संजय राऊतांच्या घरी लगीनघाई ! लेकीचं हास्य टिपण्यासाठी ‘किंगमेकर’ बनला फोटोग्राफर