महाडमध्ये “आपलं शहर, आपली माणसं” या भावनेने काम करा, एकनाथ शिंदेंची कर्मचाऱ्यांना भावनिक साद
महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्यात येणारे मदत कार्य हे "आपलं शहर, आपली माणसं" या उदान्त हेतूने करण्याची भावनिक साद पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली.
ठाणे : महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्यात येणारे मदत कार्य हे “आपलं शहर, आपली माणसं” या उदान्त हेतूने करण्याची भावनिक साद पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली. त्यानंतर मदतकार्यासाठी राज्य शासन, सर्व महापालिका प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन नेटाने काम करत आहे. सर्वांच्या सहकार्याने महाड लवकरच पूर्वपदावर येईल असा विश्वासही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान महाड येथे मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या 200 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत केलेल्या कामाची एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून संपूर्ण कामाचे कौतुक केले.
राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाड आणि पोलादपूरसाठी यापूर्वीच रवाना करण्यात आली आहेत.
आज महाड दौऱ्यादरम्यान तळीये गाव तसेच महाड सत्र न्यायालयास भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यासमयी महाड सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली. pic.twitter.com/KVYvQRnVzf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 31, 2021
आरोग्य महापालिकेची पथकाने व्यापक प्रमाणात कार्य
महाडमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या टीडीआरएफ, घनकचरा, पाणीपुरवठा, अग्निशमन, मलनि:स्सारण तसेच आरोग्य महापालिकेची पथकाने व्यापक प्रमाणात कार्य केले आहे. या सोबतच बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेची पथके देखील महाडमध्ये कार्यरत आहेत. या पथकांनी केलेल्या कार्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कौतूक करून मदतकार्य करताना महाड हे शहर आपले शहर असून ही माणसं आपली आहेत या उदान्त हेतूने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भर पावसात संपूर्ण महाड शहराची पाहणी
यावेळी महाड शहराच्या स्वच्छतेसाठी ना. एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. आज भर पावसात त्यांनी संपूर्ण महाड शहराची पाहणी केली असून महाड शहराच्या स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.राज्य शासनाकडून जास्तीत जास्त भरीव मदत देण्याचा प्रयन्त करण्यात येणार आहे. तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधून व्यवसाय उभारणीसाठी कमीत कमी व्याजात कर्ज पुरवठा देण्यासाठी राष्ट्रीय, सहकारी बँकेना, विमा कंपनीना विनंती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विविध महापालिकांचे 450 कर्मचारी मदत कार्यात
यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे 200 कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे 120 कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे 100 सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे 30 जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेने पाठवलेली ड्रनेज लाईन स्वच्छ करणारे टँकर्स, 20 जेसीबी, 20 डंपर, 5 घंटागाड्या, ठाणे महानगरपालिकेची 6 अत्याधुनिक जेटिंग मशिन्स, फायर ब्रिगेड टँकर्स, टॅंकर्स, स्प्रेइंग मशीनस, रोगराई पसरू नये यासाठी मारण्यात येणारी फोगिंग मशिन्स आदी यंत्रणेचा समावेश आहे.
महाड परिसरात कुठलाही साथरोग उद्भवू नये यासाठी वैद्यकीय पथकामार्फत स्थानिक नागरिकांच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरिकांची रॅपिड ॲटीजन टेस्ट, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात येत असून चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत.
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचारी व महाड नगर परिषद यांच्या समन्वयाने सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत असून फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे अग्निशमनदलाच्यावतीने प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात येत आहे.
पूरग्रस्त कुटूंबांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक मदत
महाड पूरस्थितीमुळे अनेकांच्या संसार उध्वस्त झाले असून आर्थिक बिकट परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. त्या कुटुंबातील व्यक्तींना आधार देवून तात्काळ त्यांना रोख रुपयांची मदत केली.
यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, महापौर नरेश म्हस्के, पोलीस उप अधीक्षक निलेश तांबे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देखमुख, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवार, मुख्याधिकारी जीवन पाटील, तहसीलदार सुरेश काशीद आदी उपस्थिती होते.
हेही वाचा :
महापुरानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय, 7 अधिकारी थेट चिपळूण-महाडला वर्ग
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अभिनेत्री स्वरा भास्करचा पुढाकार, मदतीचं आवाहन
जे. जे. हॉस्पिटलच्या तृतीय श्रेणी संघटनेचाही कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात, 27 हजारांचा निधी पाठवला
व्हिडीओ पाहा :
Eknath Shinde appeal to help Mahad Flood affected people as own people