परभणी: शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण? खरी शिवसेना कुणाची? आणि धनुष्यबाण चिन्हं कुणाचं? या तीन गोष्टीचा निक्काल निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शिंदे आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आपलाच पक्ष अधिकृत ठरणार असल्याचं दोन्ही गटाकडून सांगितलं जात आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तर मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणूनही एकनाथ शिंदे हेच हवे आहेत, असं स्पष्ट केलं आहे.
शिंदे गटाचे सेलू येथील नेते हरिभाऊ लहाने यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संतोष बांगर यांनी हे विधान केलं. यावेळी बांगर यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पक्षप्रमुखांच्या निवडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निश्चित आवडेल, असं संतोष बांगर म्हणाले.
दरम्यान, अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी मध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. अंजनगाव सुर्जी पोलिसांत ठाकरे गटाच्या शिवसैनिकावर झाले होते गुन्हे दाखल.
25 सप्टेंबरला अंजनगाव सुर्जी येथे संतोष बांगर देवदर्शनाला आले असतानाच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बांगर यांची गाडी अडवून केला होता हल्ला. यावेळी गद्दार आणि 50 खोकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणीच हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार काल जिल्हा नियोजन बैठकी निमित्ताने हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना धनुष्यबाण कोणाचा..? असा प्रश्न विचारताच सत्तार यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे बघत बांगर साहेबांचा असं उत्तर दिलं.
एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवणारा प्रत्येक शिवसैनिक हा आतापासून पेटून उठलाय. त्यामुळे आमचे आमदार आधीपेक्षा जास्त लीडने निवडून येतील यात शंका नाही, असं सत्तार म्हणाले.
आधीच्या निवडणुकीत आम्ही ज्या हिरोंचे फोटो लावले होते. त्यांच्या सोबत आम्ही गेलोये. आमच्या सोबत 13 खासदार 40 आमदार आहेत. त्यांना मिळालेली मत अधिकृत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण आमचा राहील. कोर्ट काय निर्णय देईल तो अंतिम राहील.
मात्र आमची धरणा आहे की धनुष्यबाण संतोष बांगर आणि एकनाथ शिंदे यांचे म्हणजे आमचेच राहील. येणाऱ्या निवडणूका आम्ही धनुष्यबाणावर लढवू, असं त्यांनी स्पष्ट केलं.