‘त्या’ तरुणांची शेवटची सकाळ ठरली; दोन कार आणि बाईकचा विचित्र अपघात; तीन तरूण जागीच ठार
बुलढाण्यात आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही तरुण बाईकवरून जात होते. तिन्ही तरुण एकाच गावचे आहेत. तर अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलढाणा : जीवन मृत्यूचं काहीच सांगता येत नाही. थोड्यावेळापूर्वी हसत खेळत असणाऱ्यांचं क्षणात काय होईल हे सांगता येत नाही. बुलढाण्यातील तीन तरुणांच्या बाबतीतही असंच काही तरी घडलं आहे. पहाटेपर्यंत हसतखेळत असलेल्या तीन तरुणांवर अचानक काळाने घाला घातला आहे. आजची सकाळ या तरुणांची शेवटची सकाळ ठरली. बुलढाण्यात एका विचित्र अपघातात या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
बुलढाण्याच्या खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव साकार्शा गावाजवळ दोन कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील तीन युवक जागीच ठार झाले. भरधाव बाईकने आधी एका कारला धडक दिली. ही अनियंत्रित बाईक दुसऱ्या गाडीवर धडकली. यावेळी दोन्ही गाड्या अनियंत्रित होऊन एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे या गाड्या पलटी झाल्या. कारचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की बाईकवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्वजण देऊळगाव साकार्शाचे रहिवासी
मृतक हे देऊळगाव साकार्शा येथील रहिवासी आहेत. सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. जखमींनाही तातडीने उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस या घटनेचा पंचनामा करत आहेत. तसेच जखमींची चौकशी करून अपघाताची माहिती घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बस दुभाजकाला धडकली
नाशिक आगाराची बस नाशिकवरून नागपूरला जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बेलाड फाट्याजवळ दुभाजकावर चढली. यावेळी अपघात होता होता राहिला. दुभाजक लहान असल्याने या दुभाजकाचा चालकाला अंदाज न आल्याने बस दुभाजकावर चढली. या बसमध्ये एकूण 47 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. बस दुभाजकाच्यामधोमध फसल्याने शेवटी क्रेनच्या साहाय्याने एसटी बसला दुभाजकावरून बाहेर काढण्यात आले.
मनमाडमध्ये ट्रक कोसळला
दरम्यान, मनमाड- नगर महामार्गावरील मनमाडजवळच्या अनकवाडे शिवारात कंटेनरने कट मारल्याने भरधाव ट्रक रेल्वे ओव्हर ब्रिजचा कथडा तोडून 20 ते 25 फूट खाली कोसळला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने अपघातग्रस्त ट्रक मनमाड-पुणे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी मदत कार्य राबवून अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकास बाहेर काढले. त्याच्यावर मनमाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.