उलटे कपडे घालण्याच्या प्रकाराने संताप, विद्यार्थीनींना सतावतेय वेगळीच भीती?; काय आहे भीतीचं कारण?
सांगलीत अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. नीटच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थीनींना चक्क उलटे कपडे घालण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे पालक संतापले असून या प्रकरणी कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत.
सांगली : सांगलीत नीट परीक्षेच्यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना उलटे कपडे घालून परीक्षा देण्यास सांगण्यात आले. त्यांना अंतर्वस्त्रेही उलटे घालून परीक्षा द्यायला लावल्या गेली. त्यामुळे पालकांमध्ये संताप पसरला आहे. या घटनेनंतर पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पण इथेच हे प्रकरण थांबलेलं नाहीये. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या विद्यार्थीनींना वेगळीच भीती सतावत आहे. ज्या ठिकाणी कपडे बदलले, ती जागा किती सुरक्षित होती? कुणी आपले फोटो तर काढले नसतील? कुणी व्हिडीओ रेकॉर्डिंग तर केली नसेल ना? अशी भीती या विद्यार्थींना सतावत आहे.
सांगलीत विद्यार्थीनींनी नीटची परीक्षा दिली. पण आता या मुलींच्या मनात वेगळ्याच भीतीने घर केलं आहे. ज्या ठिकाणी आपण कपडे बदलले ती जागा किती सुरक्षित होती? या ठिकाणी कोणी लपून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग तर केली नाही ना? कुणी आपले फोटो तर काढले नाही ना? आदी प्रश्नांनी या मुलींच्या मनात काहूर निर्माण केलं आहे. आमचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठीच आम्हाला उलटे कपडे घालायला सांगितले. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थीनी आणि त्यांचे पालक करत आहेत.
अन् खळबळ उडाली
7 मे रोजी सिंगल शिफ्टमध्ये नीटची परीक्षा पार पडली. यावेळी परीक्षा केंद्रावर आलेल्या मुलींना उलटे कपडे घालण्यास सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर अंतर्वस्त्रंही उलटे घालण्यास सांगण्यात आले. तसेच केस मोकळे सोडण्यासही सांगण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. केवळ सांगलीतूनच नव्हे तर संपूर्ण राज्यात या प्रकारावर संताप व्यक्त केला गेला.
पालक कोर्टात जाणार
धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी उलटे कपडे घातले नाही. ज्यांनी केस मोकळे सोडले नाही, त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे आम्हाला परीक्षा देण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता असं विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं. त्यामुळे पालक प्रचंड संतापले. पालकांनी आता या प्रकाराविरोधात कोर्टात जाऊन दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अशा प्रकाराला कायमचा आळा घालण्याची मागणीही करण्यात येणार आहे. काही पालाकांनी याबाबत वकिलांचा सल्लाही मागितला आहे.