Akola water | लोहारा येथे पाण्यासाठी मारामारी, पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे, विहिरींमध्ये ठणठणाट
200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तर 15 लिटर पिण्याच्या पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागतात. शेतामध्ये दिवसभर कष्ट करून मजुरांला 100 रुपये मिळतात. त्यामधून पाण्यावर खरंच खर्च करण शक्य आहे का?
अकोला : जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील (Balapur taluka) लोहारा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. लोहारा नागरिक मागील काही दिवसांपासून पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. या पाणीटंचाईकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न आहे. प्रशासन सुस्त असून उपाययोजना शून्य, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना, लहान मुलांना, वणवण भटकावे लागत आहे. परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या (wells dry) पडलेल्या आहेत. तसेच मन नदी सुध्दा कोरडी झाली आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. भर उन्हामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. गावामध्ये चार हातपंप आहेत. त्यापैकी एक हातपंप मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडला. तर दुसरा हातपंप येत्या दोन ते चार दिवसांत बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
विहीर आहे पण पाण्याचा ठणठणाट
लोहारा येथे सतत पाणीटंचाई भासत आहे. पाणीटंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. एप्रिल, मे आणि जून महिना शिल्लक आहे. लोहारा गावाची लोकसंख्या आठ हजारांच्या वर आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीची विहीर आहे. पण तिची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती बंद पडली आहे. गावकऱ्यांना पिण्याचे पाणीसुद्धा पुरेसे मिळत नाही. लोहारा येथे भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. एकीकडे महागाईने डोके वर काढले आहे.
पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे
आज तेलाचे भाव 180 ते 200 रुपये किलो झाले आहेत. परंतु शेतमजुरांना 100 रुपये मजुरी मिळत आहे. त्यात आणखीन भर 200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तर 15 लिटर पिण्याच्या पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागतात. शेतामध्ये दिवसभर कष्ट करून मजुरांला 100 रुपये मिळतात. त्यामधून पाण्यावर खरंच खर्च करण शक्य आहे का? एवढ्या कमी पैशात घरांमध्ये खायाला कायकाय आणावे असे अनेक प्रश्न लोहारा येथील मजुरांना पडतो. त्यामुळं लोहारा येथील नागरिकांची पाण्याची समस्या प्रशासनाने दूर करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.