लहान मुलासोबत डान्स, तर तरुणांना चोप; गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजी
नगरमधील कार्यक्रमानंतर काल सांगलीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. एवढा बंदोबस्त असूनही हुल्लडबाजांनी कार्यक्रमात धिंगाणा घातला. त्यामुळे त्यांना पोलिसांना चोप द्यावा लागला.
सांगली : जिथे गौतमी पाटील तिथे गर्दी… जिथे गौतमी पाटील तिथे हंगामा, हुल्लडबाजी… जिथे गौतमी पाटील तिथे पोलिसांकडून प्रेक्षकांना चोप… जिथे गौतमी पाटील तिथे कार्यक्रम हाऊस फुल्ल म्हणजे हाऊस फुल्ल.. आता हे समीकरण झालं आहे. सांगलीतही तेच पाह्याला मिळालं. विशेष म्हणजे हा सार्वजनिक कार्यक्रम नव्हता. एका जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाल एवढी तुफान गर्दी झाली की पोलिसांना तरुणांना चोप द्यावा लागला.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त जोडप्याने गौतमी पाटीलचा नाच-गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. विठ्ठल घोडके असं या व्यक्तीचं नाव आहे. ते मूळचे बिहारचे. पण वायफळेमध्ये सोन्याचांदीच्या व्यवसाया निमित्ताने आले आणि इथेच स्थायिक झाले. विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके याच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त या दाम्पत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.
लहान मुलासोबत डान्स
यावेळी रुपाली घोडके आणि विठ्ठल घोडके यांनी स्टेजवरच गौतमी पाटीलसोबत केक कापला. यावेळी प्रचंड आतषबाजी करण्यात आली. केक कापल्यानंतर रुपाली घोडके यांनी पहिला केक गौतमी पाटील हिला भरवला. त्यानंतर गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. यावेळी गौतमीने सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम… या गाण्यावर एका लहान मुलासोबत ठेका धरला. यावेळी तिने या लहान मुलाला डान्सच्या स्टेप्सही शिकवल्या. त्यानंतर त्या मुलाचा पापा घेत त्याचं कौतुकही केलं.
हुल्लडबाजांना चोप
गौतमीच्या कालच्या कार्यक्रमालाही तुफान गर्दी झाली होती. गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी एकच गलका केला. धांगडधिंगा केला. हुल्लडबाजी सुरू झाली. पब्लिक जागेवर बसायला तयारच नव्हती. जोरदार घोषणाबाजी आणि शिट्ट्या सुरु होत्या. पोलिसांनी या तरुणांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण जमाव काही ऐकेना.
त्यामुळे पोलिसांना या हुल्लडबाजांना काठीचा चोप द्यावा लागला. अक्षरश: पोलीस दाट ओठ खाऊन या तरुणांना बदडत होते. पण तरुणांची हुल्लडबाजी काही कमी होताना दिसत नव्हती. विशेष म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमात पोलीसच नव्हे तर खासगी सुरक्षा रक्षकही तैनात होते. पण तरीही जमावाची हुल्लडबाजी काही थांबत नव्हती.