नांदेड : राज्यात सत्तांतर होऊन वर्ष झालं तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही झडतच आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रमाणे शिवसेना-ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतो. त्यामध्ये आता भाजपनेही उडी मारली आहे. महाविकास आघाडीतील पक्षाकडून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली जात असते. त्याच बरोबर त्यांच्याकडून केंद्रावरही सडकून टीका केली जाते. त्यामुळेच राज्यातील विरोधी पक्ष आणि राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाक् युद्ध रंगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते, त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.
त्यावरून आता भाजप आणि ठाकरे गट असा आता सामना रंगला आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकावर टीका करताच आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात.
मात्र त्यांनी टीका केली असली तरी त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करत आहेत. त्याचमुळे त्यांच्याकडून सरकारवर टीका केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्तेत पदावर बसल्यापासून लोकांमध्ये जातात, त्यांच्यामध्ये मिसळतात, त्यांच्या सुख-दुःखात जातात म्हणून हे जनतेचे सरकार आहे. सरकारच्या या जमेच्या बाजूमुळेच उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे असा टोलाही गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
राज्यात शिवसेना-भाजप सत्तेत आले, तर केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारने राज्यात आणि केंद्रात आले आहे तेव्हापासून हे सरकार जनतेचे आहे हेच सिद्ध झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला फिरायला गेले आहेत. त्यांच्या या टीकेवरूनच आता शिवसेना आणि भाजप असा सामना रंगला आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर गिरीश महाजन यांनी नरेंद्र मोदी यांचे मोठेपण सांगताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी कधीही एक तास दिला नाही.
तरीही विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जाते. नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासूनच देशाच्या प्रगतीला वेग आला आहे. त्यांच्यामुळेच भारताची मानही उंचावली आहे असा प्रतिटोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले असता अमेरिकेने 15 वेळा उठून टाळ्या वाजवल्या, तर नेल्सन मंडेला आणि इतरांनाही कधी अशा टाळ्या मिळाल्या नाहीत असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.