स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा युवक होळीनिमित्त गावात गेला; का ठरली त्याची ही शेवटची होळी?
नुकतीच होळी झाली. या होळीनिमित्त साईनाथ मर्दहूर या आपल्या गावी गेला होता. तिथं त्याच्यावर पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय नक्षलवाद्यांना आला.
व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याकडून आदिवासी युवकाची हत्या करण्यात आली. युवकाला गोळी घालून हत्या केल्याची माहिती आहे. पोलीस खबऱ्या असल्याचा संशयावरून हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्रांतर्गत क्षेत्रातील मर्दहूर हे गाव आहे. मर्दहूर येथील साईनाथ नरोटे वय 26 या युवकाची नक्षल्यांनी गोळी घालून हत्या केली. पोलीस घटनास्थळ गाठून मृतदेह दुपारपर्यंत भामरागडला आणणार आहेत. साईनाथ नरोटे हा गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. होळीच्या सुट्टीला तो आपल्या गावाकडे गेले होता. नक्षल्यांनी त्याला घरून उचलून नेऊन गोळी घालून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अधुरेच राहिले
साईनाथ नरोटे हा हुशार मुलगा होता. गावात राहून अभ्यास केला. त्यानंतर तो अभ्यासासाठी गडचिरोलीत आला. येथे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षा पास झाल्यास शासकीय नोकरी मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होता. पण, त्यात त्याला यश आलं नाही. नुकतीच होळी झाली. या होळीनिमित्त साईनाथ मर्दहूर या आपल्या गावी गेला होता. तिथं त्याच्यावर पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय नक्षलवाद्यांना आला. यातून साईनाथची हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे.
नक्षल चळवळ पुन्हा सक्रिय
गेली काही दिवस नक्षल चळवळ थंडबस्त्यात होती. या घटनेतून पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांना पुन्हा अलर्ट राहण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल चळवळ खिळखिळी होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते. पण, या घटनेतून पुन्हा नक्षलावादी सक्रिय होत असल्याचे दिसून येते.