रात्री अडीच वाजता परतणाऱ्या कारला अपघात; दोघेही रात्रभर पुलाखाली गाडीत पडूनच राहिले
देवरी येथून मित्राच्या लग्न मांडवचा कार्यक्रम आटोपून परत शिरपूरकडे येत होते. रात्री २.३० च्या दरम्यान वाहन वरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला.
व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील लेंडारी गावानजीक मोठा अपघात झाला. अनियंत्रित चारचाकी पुलावरून खाली कोसळली. रात्री अडीच वाजता हा अपघात झाला. त्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाले होते. त्यामुळे दोघेही गाडीमध्येच पडून होते. सकाळी एका मुला कारला अपघात झालेला दिसला. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर घटनेत सरफराज खालिद शेख वय २४ रा. शिरपूर याला किरकोळ मार लागला. प्रणय पुरुषोत्तम उईके वय २२ रा. गांगोली हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.
रात्रभर वाहनात पडून होते
देवरी येथून मित्राच्या लग्न मांडवचा कार्यक्रम आटोपून परत शिरपूरकडे येत होते. रात्री २.३० च्या दरम्यान वाहन वरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला. लेंडारी नाल्यावर हा अपघात झाला. हा भाग निर्जन आहे. तसेच रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. वाहन पुलियाखाली पडल्याने रात्रभर कुठलीही मदत मिळाली नाही. अपघात झाल्याने वाहनाचे चारही दरवाजे लॉक झाले होते.
सकाळी सहा वाजता मुलाला दिसले
रात्र भर वाहनात अडकून असलेल्या अपघातग्रस्तांना सकाळी ६ वाजत्याच्या दरम्यान धावण्याकरिता आलेल्या एका मुलाने बघितले. त्याने त्यांना वाहनातून बाहेर निघण्यासाठी मदत केली. मोबाईल शोधून कुरखेडा येथील सोहम कांबळे यास घटनेची माहिती दिली. सोहमने चारचाकी वाहन घेऊन मित्रांसमवेत घटनास्थळाकडे धाव घेतली. घटना स्थळावरून जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता ब्रम्हपुरी येथे अस्थी तज्ज्ञांकडे उपचाराकरिता घेऊन गेल्याची माहिती आहे.