गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी धावा-धाव; आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न; हेलिकॉप्टरने आणले रक्त
Gadchiroli Health Department : गडचिरोली जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणेसाठी सातत्याने वाईट बातम्या येत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासींना साध्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे समोर आले. त्यात या बातमीने आरोग्य यंत्रणांची संवेदनशीलता समोर आली.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा तर वाजले नाहीत ना? अशा अनेक घटनांची एकामागून एक मालिका सुरू झाली. दुर्गम आणि ग्रामीण भागात साध्या आरोग्य सुविधा ही मिळत नसल्याचे या घटनांमधून उघड झाले. आताच दोन मुलं कसल्या तरी आजारामुळे आई-वडिलांनी गमावल्याचे समोर आले. त्यापूर्वी पण आई-वडिलांना झोळी करुन तर कधी खाटेवर खासगी रुग्णालयात नेल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. पण आता या बातमीने आरोग्य यंत्रणांची संवेदनशीलता समोर आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर विरोधकांपासून माध्यमातून ताशेरे ओढण्यात येत होते. नुकताच दोन मुलांचा जीव गेला. आई-वडिलांना 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. या दोघांसाठी साध्या वाहनाची सोय सुद्धा करता आली नाही. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांचे हृदय हेलावले. यंत्रणेवर खूप टीका झाली. त्यापूर्वी एका तरुणाचे वडील शेतात पडल्यावर त्यांना उपचारासाठी झोळीत आणि पुढे नदीला महापूर आल्याने नावेतून नेण्यात आले. एका मागून एक अशा घटनांनी आरोग्य यंत्रणेचे आरोग्य तर बिघडले नाही ना? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात येत होता.
आरोग्य यंत्रणेची धावाधाव
भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची प्रसूती नुकतीच झाली. प्रसूती वेळी रक्तस्त्राव झाला. या महिलेचे प्राण वाचवण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले. सध्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. या महिलेचे प्राण धोक्यात आले. तिला अशा स्थितीत तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न करणे सुद्धा धोक्याचे ठरू शकतात हे वेळीच ओळखण्यात आले.
अशा परिस्थितीत काय करावे यासाठी वेळ खर्ची घालण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने झटपट चक्रे फिरवली. या गर्भवती महिलेचे प्राण वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरने रक्त युनिट भामरागडला रवाना करण्यात आले. अख्ख्या जिल्हा प्रशासनाने या महिलेसाठी धावपळ केल्याचे दिसले. आरेवाडा येथील मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यामुळे रक्त कमी असल्याने हेलिकॉप्टरने या महिलेसाठी रक्त पाठविण्यात आले. प्रसूतीच्या वेळी रक्तस्त्राव होत असल्यामुळे आपात्कालीन स्थितीत या महिलेला रक्ताची अति आवश्यकता होती. हेलिकॉप्टरने रक्त पाठवणे अधिक सोपे आणि जलद असल्याने त्यादृष्टीने झटपट निर्णय घेण्यात आला. आरोग्य केंद्राच्या आवारातच हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. तिथून तातडीने रक्त असलेले युनिट रक्त घेऊन पोहचले.
या महिलेची प्रसूती झाली असून बाळ व माता सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती प्रशासना दिली. सध्या या भागात पूर परिस्थिती असून मार्ग अनेक बंद पडल्यामुळे हेलिकॉप्टरने हा रक्त युनिट पाठवण्यात आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे कौतुक करण्यात येत आहे.