शासकीय जत्रेहून ट्रॅक्टर ट्रॉलीतून परतत होत्या महिला, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…
दुर्गम भागातील जनतेला विविध योजनांची माहिती देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शासनातर्फे तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबाराहून परतत असतानाच घात झाला.
इरफान मोहम्मद, गडचिरोली : प्रशासकीय जनता दरबारहून घरी परतत असताना ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या, तर दहा महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना उपचारासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तेलंगणा राज्यातील मंचरीयाल येथे रेफर करण्यात आले. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एकूण 30 महिला होत्या. सदर शासकीय मेळाव्यात अनेक योजनांचा फायदा घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक दुर्गम भागातून आले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ट्रॅक्टर ट्रॉलीत 30 महिला बसल्या होत्या
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका अंतर्गत चीटुर गावात तहसील कार्यालय सिरोंचा येथे प्रशासनाने नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. याकरीता चीटुर गावाच्या आसपास असलेल्या अनेक दुर्गम भागातील गावातील नागरिक या मेळाव्यात हजर झाले होते. शासकीय जत्रा संपन्न झाल्यानंतर 30 महिला एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून परत घरी चालल्या होत्या. रगधामपेठा या गावाजवळ येताच चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॉली पलटल्याने दोन महिला जागीच ठार झाले तर दहा महिला गंभीर जखमी झाल्या.
अनेक ट्रॅक्टर चालकांकडे परवाननेच नाहीत
चालकाच्या दुर्लक्षतेमुळे अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भागात शेतीच्या अनेक कामांसाठी महिला मजूर किंवा पुरुष मजूर ट्रॅक्टर प्रवास करतात. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा हा भाग तेलंगना राज्याला लागून असल्यामुळे, आरोग्य सोयी सुविधेसाठी येथील नागरिक आपत्कालीन व्यवस्थेत तेलंगानात धावपळ करीत असतात. मात्र अनेक ट्रॅक्टर चालकांकडे परवानेच नाहीत.