नगर : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम झाला आणि तिथे गोंधळ… राडा झाला नाही असं होत नाही. गौतमीचा कार्यक्रम कुठेही असला तरी त्याला गर्दी होतेच. गर्दी असी तशी नसते तर तुफान असते. तुफ्फान तुफ्फान गर्दी होत असते. त्यामुळे पोलिसांना या गर्दीला आवरण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. तरुणांना खाली बसवावं लागतं. मात्र गर्दीत कुणा कुणाला आवरणार? एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या पब्लिकला सावरता सावरता पोलिसांचे नाकीनऊ येतात. नगरच्या कोळपेवाडीतही तोच प्रकार घडला. तुफ्फान गर्दी झाल्याने तरुणांनी राडा केला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, मोठा गोंधळ नसल्याने गौतमीचा कार्यक्रम सुरळीत पार पडला.
नगरच्या कोळपेवाडीत श्री महेश्वर फेस्टिव्हल पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो तरुण जमले. प्रचंड गर्दी झाली. जिथे नजर टाकू तिथे पब्लिक दिसत होती. गौतमीचा डान्स सुरू होताच एक कल्ला झाला. गोंगाट सुरू झाला. शिट्ट्यांचा पाऊस पडला. गौतमी गौतमीचा आवाज घुमला… गौतमीच्या अदा… ठेका आणि नजाकत पाहून तरुणाईंनेही आहे त्या ठिकाणी उभं राहून ठेका धरला. तरुणच नव्हे तर महिलाही मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमाला आल्या होत्या.
पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा… आणि मला म्हणत्यात हो, म्हणत्यात पुण्याची मैना… या गाण्यांवर तर जवळजवळ जमलेल्या सर्वांनीच ठेका धरला. प्रत्येक जण नाचत होता. एक तरुण तर स्टेजच्या अगदीजवळच नाचत होता. विशेष म्हणजे या गाण्यांवर गौतमी पाटील जशी नाचत होती, तसाच हा तरुण नाचत होता. प्रत्येक स्टेप्स तो हुबेहूब करत होता. अवघ्या 16 ते 18 वर्षाचा हा तरुण होता. काळेशर्ट आणि जीन्स घालून तो आला होता. त्याचा डान्स पाहून स्वत: गौतमीही त्याला दाद देत होती.
गौतमीचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा पब्लिकने एकच गर्दी केली. प्रचंड गोंधळ घातला. लोकांना बसायला जागा नव्हती. उभं राहूनच लोक नाचत होते. शिट्ट्या वाजवत होते. कल्ला करत होते. या लोकांना बसवता बसवता पोलिसांची दमछाक उडाली. पोलिसांनी या तरुणांना लाठीचा प्रसाद देत खाली बसवले. तरीही हुल्लडबाज काही ऐकेनात. एका तरुणाला लाठीचा प्रसाद दिला तरी तो बसायचं नाव घेत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याचं शर्ट ओढलं आणि त्याला थेट खाली बसवलं.
गौतमी पाटील ही स्टेजवर नृत्य करत होती. स्टेजच्या समोर महिला बसल्या होत्या. नाचत नाचत गौतमी या महिलांशी संवाद साधत होती. काही महिला स्टेजजवळ येऊन गौतमीचे फोटो काढत होते. गौतमीने या महिलांकडून त्यांचा मोबाईल घेतला. स्टेजवरच बसून त्यांनी सेल्फी काढला आणि या महिलांना त्यांचा मोबाईल परत केला. त्यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
कार्यक्रम झाल्यावर गौतमीने पब्लिकशी संवाद साधला. नमस्कार कसे आहेत सगळे? आवाज येत नाही. जरा हातवर करणार ना सगळे? लव यू… लव यू… आज मी आभार मानते. कोळपेवाडीकरांनी आज बोलावलं आणि कार्यक्रम ठेवला तुमचे मनापासून आभार मानते. सर्वांनी व्यवस्थित घरी जा. राडा करू नका, असं गौतमी पाटील म्हणाली.