कोल्हापूर | 14 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाला आणि भाजपच्या सत्तेला हादरे बसल्यास विधानसभा निवडणुका होतील की नाही हे सांगता येत नाही. कदाचित या निवडणुका होणारच नाही, असं मोठं आणि धक्कादायक विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुका झाल्याच तर त्या कशा होतील हे देखील सांगता येत नसल्याचा दावाही चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. तसेच त्यावर अनेक तर्कवितर्कल लढवले जात आहेत.
2024ची लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्याकरिता अतंत्य महत्त्वाची आहे.देशाच्या राजकारणाची दिशा हुकूमशाहीकडे चालली आहे. रशिया आणि चीनमध्ये जे झालं तेच भारतात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळाल्यास आपला देश रशिया आणि चीनच्या दिशेने जाणार आहे. देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही, असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
आता निवडणुका ग्राह्य धरून चालणार नाहीत. सोयीप्रमाणे निवडणुका घेतल्या जात आहेत. देशात निवडणुका जिंकण्याकरिता धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे. मतं मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण केले जात आहे. देशात फक्त काँग्रेस सोडून सर्व पक्षांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनाही आमिषं दाखवण्यात आली. मात्र कोणीही विचार सोडला नाही. या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात फक्त काँग्रेसच लढा देऊ शकते, असं चव्हाण म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या राजकारणावरही टीका केली. अजित पवार यांचा गट भाजपसोबत आहे. पण तरीही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत संभ्रम आहे, असं सांगतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष महाराष्ट्रात आला आहे. तो आताच का आला? बीआरएसचा बोलविता धनी कोण आहे हे स्पष्टच आहे, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरल्याचंही त्यांनी सांगितलं. आपली आता जादू चालेना त्यामुळे मोदी आता माझ्यावर अवलंबून राहू नका असं सांगत आहेत. लोक आता मोदींना प्रश्न विचारत आहेत. मोदींच फोटो घेऊन गेला तर लोक प्रश्न विचारणारच, असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत फुटीचा परिणाम काय होईल यासाठी आढावा बैठक सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर झालेली स्थित्यंतर त्याचा आढावा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय हे निश्चितपणे काही कोणाला माहिती नाही. या बैठकीत राजकीय तुलनात्मक अभ्यास केला. माझा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे पाठवणार आहे. पुढची रणनीती कशी आखायची आणि जागावाटप कसे करायचे यासाठी मदत होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढणार आहेत. तर आम्ही पदयात्रा काढणार आहोत. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या पदयात्रेचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आढावा बैठकीत उमेदवार निश्चित झालेली नाही. दोन्ही जागा काँग्रेस पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.