अजितदादा नव्हेच… अमोल कोल्हे यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण?; कोल्हे यांनी वेगळच सांगितलं
या मुलाखतीसाठी मी कोणतीही प्रॅक्टिस केली नव्हती. सर्व रिअल होतं. सत्य होतं. मुलाखत स्क्रिप्टेड नव्हती हे महत्त्वाचं, असं अमोल कोल्हे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते फडणवीसांपर्यंत राज ठाकरे सडेतोड बोलल्याचेही ते म्हणाले.
मिरज : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे राज्यातील विविध ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून या पोस्टर्सवर उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची पोस्टर्स लावली आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्याच नावावर एकमत असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी वेगळंच नाव घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन चेअरमन प्रतिक पाटील यांचा सत्कार खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संबोधित करताना अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केलं. राज्यात जयंत पाटील हेच मुख्यमंत्री व्हावेत असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. कोल्हे यांच्या यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कोल्हे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नावाला सर्वसंमती नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.
सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व
शिवराज्य यात्रेची संपूर्ण आखणी सुरू असताना मी कायम प्रतिक पाटील यांना बघायचो. त्यांना कधी कार्यालयात भेटायचो. कधी त्यांच्या घरी भेटायचो. त्यावेळी सुसंस्कृत घरातला व्यक्ती काय असतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रतिक दादा आणि राजवर्धन दादा. कुठेही आवाजवी काही सांगणं नाही. काही तरी विचारल्याशिवाय बोलणं नाही. हे सर्व पाहत असताना. एक गोष्ट मला कायम जाणवली. साहेब म्हणाले, नेत्यांची मुलं अनेकदा हेकेखोर असतात. हे आपल्याला कायम बघायला मिळतं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
जबाबदारीचं भान असलेला नेता
जयंत पाटील याांनी महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद भूषवलं आहे. आजही माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्रातील सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहतो. अशा कर्तृत्व संपन्न पित्याचं कर्तृत्व समोर असताना. पित्याच्या कर्तृत्वाचा माज नाही, तर पित्याच्या कष्टाचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीचं भान असलेलं नेतृत्व म्हणून मी प्रतिकदादाकडे बघतो, असंही ते म्हणाले.
पहिल्यांदाच मुलाखतकार बनलो
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलताना राज ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवरही भाष्य केलं. मुलाखत चांगली झाल्याचं सर्वच सांगत आहेत. त्यामुळे मलाही वाटते की ठीक झाली असावी. एक डॉक्टर आणि अभिनेता म्हणून मी काम करत होतो. पण पहिल्यांदाचा मुलाखतकार बनून मुलाखत घेतली. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता. राज ठाकरे यांनी दिलखुलासपणे आणि बेधडक सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. हा चांगला अनुभव होता, असं ते म्हणाले.
हिंदुत्वाची व्याख्या आवडली
सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे लोकशाहीबद्दल अत्यंत समर्पक बोलले. त्यामुळे मी त्यापलिकडे जाऊन बोलणं योग्य नाही. हिंदुत्वाबद्दलची राज ठाकरे यांची लाईन मला आवडली. त्यांनी हिंदुत्वाची परिभाषा नेमकेपणाने मांडली. मला त्यांची ही परिभाषा आवडली, असंही त्यांनी सांगितलं.