जयंत पाटील यांच्या चिरंजीवाचा आज विवाह; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमनेसामने येणार?
या लग्न सोहळ्यास वाळवा तालुक्यासह संपूर्ण राज्यातून अनेक मंत्री, आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेससह विविध पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
सांगली: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाण्यातील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी तर फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून त्यांना तोंडघशी पाडण्याचाही प्रयत्न केला. त्याला नंतर ट्विट करून फडणवीस यांनी उत्तरही दिलं. मात्र, हे आरोप-प्रत्यारोप होऊन काही तासही उलटत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चिरंजीवाचं लग्न. या लग्नाच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंतराव पाटील यांचे चिरंजीव, युवा नेते प्रतीक पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा आज शुभ विवाह पार पडणार आहे. राजारामनगर (इस्लामपूर) येथे आज सायंकाळी 5.35 वाजता हा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे.
या लग्न सोहळ्यास वाळवा तालुक्यासह संपूर्ण राज्यातून अनेक मंत्री, आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेससह विविध पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
जयंत पाटील यांना दोन मुले असून थोरला मुलगा राजवर्धन तर धाकटा मुलगा प्रतीक आहे. राजवर्धन याचे लग्न झाले आहे तर प्रतीक याचा आज विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
प्रतीक पाटील यांनी 2014 पासून वाळवा इस्लामपूर मतदार संघात राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. प्रतीक यांनी आपले परदेशात लंडन येथे इजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे.
सध्या ते मतदारसंघात लक्ष्य देत आहेत. अनेक सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात भरीव काम करत त्यांनी कामातून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तर सांगलीतील उद्योगपती राहुल किर्लोस्कर याची सुकन्या अलिका यांनीही बिझनेस क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलं आहे.
इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस लग्न सोहळ्याची भव्य व सुंदर व्यवस्था केली आहे. इस्लामपूर-बहे रस्त्याच्या बाजूलाच मुख्य प्रवेशद्वार उभा केला आहे.
राजारामबापू इनडोअर स्टेडियमच्या मागे पश्चिमेस तोंड करून देऊळ, घंटा आणि पुलांच्या चित्रांनी सजविले भव्य व्यासपीठ उभे केले आहे. व्यासपीठासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था केली असून महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कपिल पाटील, भागवत कराड, आदित्य ठाकरे, विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्याती मंत्री, आमदार आणि खासदारांसह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.