सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. या शाही सोहळ्याला राजकारण आणि उद्योग जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या लग्नाला आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी जयंत पाटील यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले. आभार मानत असताना जयंत पाटील यांनी आई वडिलांची आठवण काढली. त्यानंतर शरद पवार यांचं नाव घेताच जयंत पाटील यांना हुंदका अनावर झाला. जयंत पाटील अत्यंत भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि काही क्षण ते स्तब्ध झाले. काय बोलावं त्यांना सूचेना. हे दृश्य पाहून उपस्थितांचंही मन हेलावून गेलं.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांचा विवाह सोहळा पार पडला. मुलाच्या लग्नसोहळ्या प्रसंगी पाहुण्यांचं स्वागत करताना जयंत पाटील भावूक झाल्याचे दिसून आलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही यावेळी उपस्थित होते.
पवार उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानताना जयंत पाटील यांचा कंठ दाटून आला. आई आणि वडील यांची आठवण काढतानाच, शरद पवार यांच नाव घेताच जयंत पाटील यांना हुंदका अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ते काही क्षण शांत झाले.
या लग्न सोहळ्यानंतर जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानणारे ट्विटही केलं आहे. माझ्या तालुक्यातील जनतेसह राज्यभरातील अनेक मान्यवर या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद नव दांपत्याला कायम राहतील याची आम्हाला खात्री आहे, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांच्याशी थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली होती.
या विवाह सोहळ्याला शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, शंभुराजे देसाई, हसन मुश्रीफ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.