हिंमत वाढली, अक्कलकोटमध्ये फडकले कर्नाटकचे झेंडे, वातावरण तापले; कर्नाटकात जाण्याची स्पर्धाच लागली
अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथील ग्रामस्थांनी कर्नाटकाचा जयघोष केल्याने कर्नाटकात जाण्याचे लोण पसरत आसल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर: कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील तलावात धरणाचे पाणी सोडून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलेले असतानाच आणखी एक बातमी येऊन धडकली आहे. आता सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील एका गावात कर्नाटकचे झेंडे फडकले आहेत. यावेळी या ग्रामस्थांनी कर्नाटकाच्या नावाचा जयघोषही केला. तसेच आम्ही लवकरच कर्नाटकात जाण्याचा ठराव करणार असल्याचंही जाहीर केलं. सोलापुरातील आधीच काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं लोण पसरताना दिसत असून आता त्यात आणखी एका गावाचा नंबर लागला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे फडकवले आहेत. या ग्रामस्थांनी कर्नाटकचा जयघोष करत कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने 75 वर्षात आम्हाला किमान रस्ते, वीज आणि पाणी देखील पुरवले नाही.
मात्र कर्नाटक सरकार आमच्या शेजारील कर्नाटकातील गावांना सर्व सुविधा पुरवते. त्यामुळे लवकरच आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबतचा ठराव ग्रामपंचायत करणार आहोत असा इशारा उडगी ग्रामस्थांनी दिलाय.
अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथील ग्रामस्थांनी कर्नाटकाचा जयघोष केल्याने कर्नाटकात जाण्याचे लोण पसरत आसल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता उडगीनेही कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कर्नाटकाच्या कुरघोडीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. कर्नाटक कायम कुरघोडी करत आहे. आपली आपापसात भांडणं होत राहतील. पण आपल्याला एकत्र यायला पाहिजे.
एक राहिले पाहिजे आणि कर्नाटकला समजून सांगितले पाहिजे. केंद्र देखील पॉझिटिव्ह आणि राज्याचे नेतृत्व देखील विचार करत आहे. अल्टीमेंटम दिलेले आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.