‘एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला डावा हात कुठे वापरतात ते दाखवतो’, भास्कर जाधव यांची खोचक टीका
भास्कर जाधव यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर खोचक टीका केलीय. भास्कर जाधव आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरुन निशाणा साधला.
कोल्हापूर | 11 जून 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर प्रचंड टीका केली. राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्यभरात राबवला जात आहे. या कार्यक्रमावर भास्कर जाधव यांनी टीका केलीय. तसेच या कार्यक्रमाची सरकारकडून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. पण सरकारच्या जाहिरातीवरुन भास्कर जाधव यांनी खोचक टीका केली आहे. या जाहिरातीत मंत्री हात दाखवताना दिसतात. पण त्यावरुन भास्कर जाधव यांनी मंत्र्यांवर निशाणा साधलाय.
“20 जूनला हे सुरत, गुवाहाटीला गेले. त्यानंतर 30 जून 2022 ला आले. माझं या सरकारला आव्हान आहे 30 जून 2022 ते आतापर्यंत तुमच्या सरकारने आखलेल्या योजना काय? तुम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम लावताय, त्यामध्ये तुमच्या सरकारने आखलेल्या योजना कोणत्या? त्याचे लाभार्थी कोण?”, असे प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केले.
भास्कर जाधव यांची खोचक टीका
“अहो 40 वर्षांपूर्वी संजय गांधी निराधार योजना आली, घराच्या पाठीमागे तो शेष खड्डा पाणी जिरावं म्हणून काढतात त्याचे लाभार्थी, महिला बचत गटाचे लाभार्थी यांना देतात आणि म्हणतात आमच्यामुळे तुम्हाला लाभ मिळाला. अरे यांच्यामुळे लाभ मिळाला? यांनी 52 कोटी रुपये शासन आपल्या दारीवर खर्च केला. 999 कोटी रुपये यांनी जाहिरातीवर खर्च केला”, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
“कोणतीही बस बघा, यांचे फोटो दिसतात. मुंबईतील कोणतीही बस स्टॉप बघा, यांचे फोटो. कुठलीही जाहीरात बघा, यांचा फोटो दिसतो. त्यात एकाचा डावा हात आणि एकाचा उजवा हात. तुम्ही बघा, एका मंत्र्याचा उजवा हात आहे, तर दुसऱ्या मंत्र्याचा डावा हात आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला डावा हात कुठे वापरतात ते दाखवतो. तर दुसरा म्हणतो मला दाखवतो काय मी तुला दाखवतो. असंच चाललं आहे. जनतेच्या वाटेला काहीच नाही”, अशी खोचक टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली.