Video Chandrapur leopard | बिबट्या आला रे आला! चंद्रपुरात रात्री घरात शिरला बिबट्या, पिंजराबंद करण्यात यश
चंद्रपुरातील सावली तालुक्यात बिबट्या आला रे आलाची घटना आज पहाटे घडली. रात्री केव्हातरी हा बिबट उसेगावातील भगवान आवारी यांच्याकडे आला. पहाटे ही बाब लक्षात आली. वनविभागाने पिंजरा आणला. बिबट्याला पिंजराबंद करण्यात आले.
चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सात उसेगाव (Usegaon) येथे भगवान आवारी नामक ग्रामस्थाच्या घरात पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या शिरला. घरातील महिला सिंधुबाई यांना जाग आली तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची त्यांना चाहूल लागली. उठून पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बिबट्या बाहेर दिसला. जीव वाचविण्यासाठी त्यांनी घराबाहेर धाव घेतली. घराची दारे बंद करून याची माहिती सावली वनविभागाला (Forest Department) देण्यात आली. वनविभागाची आणि इको प्रो वन्यजीव संस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर त्यांना बिबट पिंजराबंद (Bibat Cage) करण्यात यश आले. बिबट्याला तपासणीसाठी चंद्रपुरात आणले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती चंद्रपूरचे उपविभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली.
अशी घडली घटना
सावली परिसरात जंगल आहे. जंगलामुळं वन्यप्राणी गावात शिरतात. काल रात्री चक्क बिबट्याच घरात शिरला. तो केव्हा आला काही पत्ता लागला नाही. सिंधुबाई पहाटे नेहमीप्रमाणे उठल्या. त्यांनी खाटेच्या खाली बिबट्या दिसला. बिबट्या पाहताच त्या घराबाहेर पडल्या. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. लोकं जमा झाले. या गर्दीतच बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
पाहा व्हिडीओ
चंद्रपूर : उसेगावात घरात शिरलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडून बाहेर नेताना. pic.twitter.com/ccRPzSkVOE
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 7, 2022
वनविभागाला कळविले
माणसं जंगलात गेली तर ते गुन्हेगार ठरतात. प्राण्यांचं तसं नाही. ते जंगलाव्यतिरिक्त गावातही शिरू शकतात. मुके प्राणी बिचारे. त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करणार? बिबट्यावर हल्ला करणं हासुद्धा गुन्हाचं. त्यामुळं गावकऱ्यांनी रीतसर वनविभागाला कळविलं. वनविभागाचे कर्मचारी पिंजराच घेऊन आले. मग, बिबट्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. तोपर्यंत गावकऱ्यांच्या जीवात जीव नव्हता. तो भीतीपोटी कोणावर हल्ला तर करणार नाही, अशी भीती गावकऱ्यांना वाटत होती. पण, पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.