BIG BREAKING | ‘या’ महिन्यात होणार लोकसभा निवडणुका; प्रकाश आंबेडकर यांचे मध्यावधीचे संकेत
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरुवात केली आहे. मात्र त्यांनी ही सुरुवात अगोदरच करायला पाहिजे होती. त्यांना मानणारा एक वर्ग आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
अकोला : येत्या 2024मध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. त्या आधी राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, असं असलं तरी लोकसभा निवडणुकांबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. देशात येत्या पाच महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यासाठीच भाजपने 2 हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. निवडून येण्यासाठीचं भाजपचं हे चोकिंग राजकारण आहे. विरोधकांना निधी मिळू नये हा त्यामागचा हेतू आहे. त्यासाठीच भाजपने ही खेळी खेळली आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षांनी गाफिल राहू नये. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
तर वेगळं होऊ शकतो
दरम्यान, या आधी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी, नाना पटोले आणि माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्याविषयीच्या प्रश्नांवर उत्तरे दिली होती. महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्ही वेगळं होऊ शकतो. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीतील असलेली अस्थिर परिस्थिती ऑगस्टपर्यंत स्थिर होण्याची शक्यता दिसत नाही, असं त्यांनी सांगितलं.
मोदींना निमंत्रण आहे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत युनायटेड नेशनमध्ये दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यांना निमंत्रण दिलेले आहे का? भाजप आणि आरएसएसने देशात आणि देशाच्याबाहेर जागतिक पंतप्रधान आणि सर्वश्रेष्ठ असल्याचा धिंडोरा पिटवाला. त्यामुळे भारतात असलेली कॉलमनी हे युरोप देश भारताला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास जुलैमध्ये पैसे विड्रॉल होईल आणि त्यानंतर भारतात महागाईला वाढेल. याकडे राष्ट्रीय पक्षांनी लक्ष देऊन हा मुद्दा लावून धरावा, असं ते म्हणाले.
अमित शाह काहीही करू शकतात
अमित शाह यांनी महाराष्ट्रात 48 जागा जिंकण्यासाठी शिवसेनेला कमकुवत केले आहे. पुढच्या काळात ईडी आणि नाबार्डच्या रिपोर्टखाली राष्ट्रवादी पक्ष कमकुवत केले जाऊ शकतात. 48 जागा जिंकण्यासाठी अमित शाह काहीपण करू शकतात, असंही ते म्हणाले.