आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन, सरकार दखल घेणार?
"आयएएस आधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारावा. त्यांना रुजू करुन घ्यावे", अशी मागणी करत परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आज राज्य शासनाविरोधात निदर्शने दिली.
प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : “आयएएस आधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारावा. त्यांना रुजू करुन घ्यावे”, अशी मागणी करत परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आज राज्य शासनाविरोधात निदर्शने दिली. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आयएएस अधिकारी आंचल गोयल या जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार होत्या. त्यांचा फोटोही सर्व वर्तमानपत्रात झळकला. त्या चार दिवस अगोदर परभणीला आल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्याच होत्या.
नेमकं प्रकरण काय?
आंचल 31 जुलैला दुपारपर्यंत पदभार घेणार असेच सर्वसामान्यांना वाटत होते. पण त्या दिवशी दुपारनंतर अचानक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशावरुन अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपविला. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. जिल्ह्यातील काही नेतेमंडळींना आंचल यांचा धसका बसला असावा, त्यामुळेच त्यांनी त्यांना जिल्हाधिकारी होण्यापासून रोखलं, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलन छेडले.
‘आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा’
“आंचल गोयल यांना का रुजू करून घेतले नाही? त्या रुजू झाल्या तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? हे सर्वसामान्य जनतेला कळालेच पाहिजे. एक महिला, आयएएस आधिकारी तिचे सात-आठ महिन्याचे बाळ घेवून पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षीय नेते मंडळी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी वरिष्ठ स्तरावरुन डावपेच करतात. ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा”, अशी मागणी आंदोलकांनी केली.
नेतेमंडळींची मंत्रालयात धाव?
आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारु नये यासाठी काही नेतेमंडळीने मंत्रालयात धाव घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पण नेमकं कोणत्या नेत्याने मंत्रालयात धाव घेतली हे समजू शकलेलं नाही. पण त्यांचा तो प्रयत्न अखेर यशस्वी ठरला. गोयल यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे हा पदभार द्यावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले. त्यानंतर मुगळीकर यांच्याकडे 31 जुलैला संध्याकाळी पदभार सोपविण्यात आला.
संबंधित बातमी : पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच परभणीत, डॅशिंग अधिकारी आंचल गोयल यांची ऐनवेळी बदली रद्द