धक्कादायक बातमी ! सोलापूरमधील 28 गावांचा कर्नाटकात जाण्याचा ठराव, बोम्मईंना फॅक्स पाठवला; सीमावादाच्या लढ्याला अपशकून?
एखादी महिला डिलिव्हरीला घेऊन जात असताना रस्त्यातच तिची डिलिव्हरी होते. एखाद्या रुग्णाला शहरात घेऊन जात असताना तो रस्त्यातच दगावतो, इतके खराब रस्ते आहेत.
सोलापूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही जिल्ह्यांवर दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. राज्यातील एकही गावच काय जमिनीचा तुकडाही कर्नाटकाला जाऊ नये म्हणून राज्याने जोरदार प्रयत्न सुरू केलेले असतानाच सीमावादाच्या या लढ्याला अपशकून होण्याची चिन्हे आहेत. सोलापुरातील 28 गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठरावही केला आहे. एवढंच नव्हे तर बोम्मई जिंदाबादच्या घोषणाही या गावातील गावकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 28 गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर गावकऱ्यांनी बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असो, अशा घोषणा दिल्या आहेत. तडवळसह 28 गावातील ग्रामस्थ या मागणीसाठी एकवटले आहेत.
आम्हाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही. म्हणूनच वैतागून आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललोय, त्यांना फॅक्सही पाठवलाय. कर्नाटकात सामील झाल्यावर सर्व सुविधा देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, असं या ग्रामस्थांनी सांगितलं.
यापूर्वी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो. मात्र मुख्यमंत्री असूनही त्यांनी आमच्या गावांचा विकास केलेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 28 ते 30 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्याचीही दखल राज्यकर्त्यांनी घेतली नाही. जर लोकप्रतिनिधी, प्रशासन आमची दखलच घेणार नसतील तर आम्ही राज्यात राहू कशाला? असा सवाल या गावकऱ्यांनी केला आहे.
एखादी महिला डिलिव्हरीला घेऊन जात असताना रस्त्यातच तिची डिलिव्हरी होते. एखाद्या रुग्णाला शहरात घेऊन जात असताना तो रस्त्यातच दगावतो, इतके खराब रस्ते आहेत. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहोत. याबाबत 28 गावांनी ठराव केलाय, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.