पावसाचा रौद्रावतार, गेवराईतील तीन तलाव फुटले, नांदेडमध्येही शेतकऱ्यांची दैना, अशोक चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावर
गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादसह बीडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. गेवराई तालुक्यात तर पावसाने कहर केलाय. गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी परिसरातील तीन तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर नांदेडमध्येही पावसाने विदारक अवस्था केली आहे.
बीड : गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादसह बीडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. गेवराई तालुक्यात तर पावसाने कहर केलाय. गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी परिसरातील तीन तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावाचे पाणी शेतात घुसल्याने खरिपाचे सर्वच पीके वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. तलाव फुटून हजारो हेक्टरवरील पीके उध्वस्त झाली आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द येथील पाझर तलाव फुटला. तलावाचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पीके अक्षरशः वाहून गेली. यंदा पाऊस चांगला आल्याने खरिपाची पीके चांगली आली होती मात्र या मुसळधार पावसाने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.
तलाव फुटल्याने उडीद, मूग, कापूस आणि फलबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत झालेला नुकसान पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केलीय. नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
नांदेडमध्येही पावसाने शेतकऱ्यांची दैना
गोदावरी नदीला आलेल्या पुराने नांदेड शहरात झालेल्या नुकसानीची मंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केलीय. गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहत असून त्यामुळे सखल भागात पाणी साचलय. याच सखल भागाची मंत्री चव्हाण यांनी पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतलाय.
यावेळी पालक मंत्र्यांनी पूरग्रस्त लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पुरग्रस्तानी मंत्री चव्हाण यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला, त्यामुळे काही काळ सोबतच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याची भंबेरी उडाली. दरम्यान, पूरग्रस्तांना योग्य ती मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय.
या नंतर मंत्री अशोक चव्हाण हे पत्रकार परिषद घेऊन नुकसानीची माहिती देणार आहेत. यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अमरावतीत मुसळधार, भिवापूरमध्ये रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान 4 जणांना वाचवण्यात यश
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले एकत्र झाले आहेत,तर तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील तलावात पूर आल्याने सह जन पुरात अडकले होते या ठिकाणी रात्रभर मदतकार्य सुरू आहे, रेस्क्यू टीमने रात्री दोघांना बाहेर काढले तर चार जणांना तब्बल 15 तासांनी सकाळी रेस्क्यू टीमने बाहेर काढले.
अमरावती येथील काही पर्यटक तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे आले होते, मात्र अचानक मुसळधार पावसामुळे ते काल दुपारी 4 वाजता पासून ते भिवापूर येथील तलावात मधोमध अडकले होते, यातील सहा जना पैकी दोघांना रात्रीच सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
तर ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे रेस्क्यू टीमने अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर प्रयत्न चालवले मात्र मुसळधार पावसामुळे मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला त्यामुळे सकाळी 6 वाजता पुन्हा मदत कार्य सुरु झाले पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन करत चार जणांना 15 तासांनी बाहेर काढण्यात आले.
(maharashtra Marathwada beed nanded heavy Rain Farmer big loss)
हे ही वाचा :
मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबर फटका, दोन दिवसात 31 जणांचा बळी, पाच जण बेपत्ता