हे गाव लय न्यारं… होळीच्या दिवशी महिला पुरुषांना काठीने झोडपतात; महाराष्ट्रातील हे गाव माहीत आहे काय?
आम्ही आदल्या दिवशी होळी करून दुसऱ्या दिवशी धुळवड करतो. आम्ही झेंडा लावतो. पुरुष येऊन झेंडा ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही त्यांच्या हाताला झेंडा लागू देत नाही.

सांगली : संपूर्ण राज्यात काल धुळवडीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. तरुणांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनीच होळीचा सण अत्यंत जल्लोषात साजरा केला. रंग आणि पाण्याची वरेमाप उधळणही करण्यात आली. महाराष्ट्रातील असं एकही गाव नसेल जिथे धुळवड साजरी केली गेली नाही. सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला. पण महाराष्ट्रातील असं एक गाव आहे, जिथे धुळवड आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरी केली गेली. या गावात एकमेकांना रंग लावण्यात आला. पण महिलांनी पुरुषांना काठीने येथेच्छ झोडपूनही काढले. या गावातील धुळवडीच्या दिवसाची ती परंपराच आहे. दरवर्षी ती नेमाने पाळली जाते.
होळीच्या निमित्ताने पुरुष मंडळीची महिलांकडून येथेच्छ धुलाई करून अनोखी होळी साजरी करण्याची प्रथा सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाकडून जोपासली जात आहे. या अनोख्या परंपरेला ‘झेंड्याचा खेळ’ असं नाव आहे. या झेंड्याच्या खेळात महिला या पुरुषांना काठीने बदडून काढतात. गोसावी समाजात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. या प्रथेमुळे महिलाना वर्षातून एकदा पुरुषांना मनसोक्त बदडून काढायची संधी मिळते.
काय आहे पंरपरा?
सांगलीच्या मिरजेत मोठ्या संख्येने गोसावी समाज वास्तव्यास आहे. या गोसावी समाजाकडून अत्यंत वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. होळीच्या तिसऱ्या दिवशी ‘झेंड्याचा खेळ’ हा पारंपारिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. या खेळात महिला या पुरुष मंडळीना काठीने बदडून काढण्याची प्रथा आहे. गोसावी समाजात वर्षानुवर्ष ही प्रथा चालत आली आहे. गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो. ज्याची कमान ही महिलांच्या हाती असते.
सर्व महिला या झेंड्यांचं रक्षण करण्यासाठी हातामध्ये काठ्या घेऊन सज्ज असतात. रंगांची उधळण करत पुरुषांनी तो झेंडा पळवायचा खेळ असतो. तर महिला त्यांना त्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळीना पिटाळून लवण्यासाठी महिला त्यांना काठीने बदडून काढतात. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा गोसावी समाज बांधवांकडून जोपासली जात आहे. एरव्ही पत्नीस मारहाण करणारे पती, या निमित्ताने महिलांनाकडून आनंदाने मार खात असतात. हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.
एक दिवस आमचा असतो
आम्ही आदल्या दिवशी होळी करून दुसऱ्या दिवशी धुळवड करतो. आम्ही झेंडा लावतो. पुरुष येऊन झेंडा ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही त्यांच्या हाताला झेंडा लागू देत नाही. झेंडा चोरायला आलेल्यांना आम्ही पिटाळून लावतो. त्यासाठी त्यांना काठीने मारतो. आमचा झेंडा आम्ही त्यांना या वर्षीही मिळू दिला नाही. आजच्या खेळातही पुरुष हारले आहेत. आम्ही वर्षातून एकदा त्यांना मारत असतो. वर्षभर ते आमचे हाल करतात. पण वर्षातून आम्ही एक दिवस त्यांना मारत असतो, असं वंदना गोसावी म्हणाल्या.
महिलाच जिंकल्या
शंभरहून अधिक वर्ष झाले तरी आम्ही होळीचा सण साजरा करतो. आमचे वाडवडील हा सण साजरा करत आले आहेत. हीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. पहिल्या दिवशी होळी जाळल्या जाते. त्यानंतर कोंबड्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर आम्ही धुळवड साजरी करतो. गेल्या काही वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतो. महिलांच्या हातात झेंडा असतो. आम्ही हा झेंडा ओढून नेण्याचा प्रयत्न करतो. कोरोनामुळे तीन वर्ष आम्ही हा खेळ खेळलो नाही. आज तीन वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच खेळलो आहे. पण आजचा खेळही महिलाच जिंकल्या आहेत, असं शेखर गोसावी यांनी सांगितलं.