“ठऱलेल्या फॉर्म्यूल्यानुसारच सगळं होणार”, माणिकरावांच्या तक्रारीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या तक्रारी पाहता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेकडून काँग्रेसला सापत्न वागणूक मिळते. जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार असताना काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात शिवसेना धुडगूस घालते. जिल्हा स्तरीय समितींमध्ये काँग्रेसला योग्य ते स्थान मिळत नाही. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीधर्म पळत नाहीत, अशा तक्रारींचा पाढाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज (9 ऑगस्ट) मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यापुढे वाचला. ठाकरे काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. (Manikrao Thackeray complaint against Shivsena in Yavatmal Vijay Wadettiwar said appoint on different committee will be by Maha Vikas Aghadi formula)
माणिकराव ठाकरे यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार
माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या तक्रारी पाहता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. यवतमाळमध्ये शिवसेना जिल्ह्यातील समितीवर वर्चस्व ठेवत असल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे माणिकराव ठाकरे यांनी विजय वडेट्टीवार यांच्याकडे वरील तक्रार केली आहे. माणिकराव ठाकरे यांनी थेट मंत्र्यांकडे अशी तक्रार केल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
दोन भाऊ असले तरी भांडण होत असतात
माणिकराव ठाकरे यांनी वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार केली असता यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस नाही. दोन भाऊ असले तरी भांडण होत असतात. इथं तर तीन पक्षांचं सरकार आहे. मागील सरकारमध्ये भाजप-सेनेची भांडणं आपण रोज पाहत होतो. मत मांडण्याचा ठाकरे यांचा हक्क आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
आघाडीमध्ये ठरलेल्या फॉर्म्यूल्याप्रमाणे समितीवर नियुक्ती
तसेच, महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्या फॉर्म्यूल्याप्रमाणे समितीवर नियुक्ती करण्यात येईल. ज्या पक्षाचा पालकमंत्री त्यांना 60 टक्के, तर इतर 40 टक्क्यांमध्ये दोन पक्ष असा फार्म्यूला आहे. तसेच मतदारसंघ निहाय ज्या पक्षाचा आमदार आहे, त्यांना 60 टक्के व इतरांना 20-20 टक्के असा फॉर्म्यूला ठरलेला आहे. याच फार्म्यूल्याप्रमाणे काम व्हावं असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
आढावा बैठक मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जाणार
दरम्यान, यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा गड होता. हा गड परत मिळवण्यासाठी आता काँग्रेसने कंबर कसल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितले. ग्रामीण भागापर्यंत आढावा बैठक मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात एकही विधानसभा आमदार नसलेला काँग्रेस पक्ष आगामी दिवसात काय चमत्कार घडवणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केलेल्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार, संभाजीराजेंची घोषणा
काम तर दूरच, निधीवरुन शिवसेना-भाजप-मनसेत जोरदार जुंपली !
‘दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो’, पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संभाजीराजे का संतापले?
(Manikrao Thackeray complaint against Shivsena in Yavatmal Vijay Wadettiwar said appoint on different committee will be by Maha Vikas Aghadi formula)