पवार साहेब, या थोबाडांना आवरा; शरद पवार यांना कुणाचे आवाहन?
माझी शरद पवार यांना विनंती आहे. त्यांनी या थोबाडांना आवरावं. कोणी म्हणतंय संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. कोणी म्हणतंय औरंगजेब क्रूर नव्हता.
संदीप वानखेडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं विधान केलं. त्यानंतर औरंगजेबाने विष्णूचं मंदिर पाडलं नव्हतं, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांना घेरलं आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान खपवून न घेण्याचा इशाराच दिला आहे. एवढेच नव्हे तर भाजपने तर पवार आणि आव्हाडांविरोधात आंदोलनही केलं आहे. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच साकडे घातले आहे. पवार साहेब, या थोबाडांना आवरा, असं आवाहनच संजय गायकवाड यांनी केलं आहे.
औरंगजेब बादशाहने अनेक वर्ष भारतावर राज्य केलं. त्याने राज्य मिळवण्यासाठी आपल्या सख्या मोठ्या भावाची गर्दन कापली. वडिलांना तुरुंगात टाकलं. सर्व भावांचा खात्मा करून गादी बळकावली. त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडण्याचं फर्मान सोडलं. जगात झालं नाही एवढं धर्मांतर औरंगजेबाने करून घेतलं. तरीही तो क्रूर नाही असं कसं म्हणता? असा सवाल संजय गायकवाड यांनी केलं आहे.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचे हाल केले. संभाजी महाराजांच्या कानात शिसं ओतलं, डोळ्यात गरम सलाखे टाकले, जीभ छाटली, नखं कापली आणि अंगावरची सालटी काढली. हालाहाल करून संभाजीराजेंची हत्या केली.
पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही. एवढ्या क्रूरपणे वागणाऱ्या बादशाहाला ते चांगला असल्याचं सर्टिफिकेट देत आहेत. असं करून ते आमच्या थोर राजांचा अपमान करत आहेत, असा हल्ला गायकवाड यांनी चढवला.
माझी शरद पवार यांना विनंती आहे. त्यांनी या थोबाडांना आवरावं. कोणी म्हणतंय संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. कोणी म्हणतंय औरंगजेब क्रूर नव्हता. मग संभाजी महाराजांची हत्या कुणाच्या आदेशाने झाली? आपल्या भावाला मारणारा औरंगजेब कोण होता?
वडिलांना तुरुंगात डांबणारा औरंगजेब कोण होता? तो क्रूर नाहीये? त्याचा सत्कार केला पाहिजे? त्याने आमच्या राजाला मारलं नाही? या लोकांना विधान करताना लाज वाटली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मी औरंगजेब क्रूर नव्हता असं म्हटलंच नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगजेब क्रूरच होता. त्यात वादच नाही. माझं विधान एका मंदिराशी संबंधित होतं. औरंगजेबाने ते पाडलं नव्हतं. त्याचे पुरावे मी लवकरच देईन, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.