सोलापूर : वजन वाढल्यामुळे चालता येत नव्हतं. एसटीत चढता येत नव्हतं. घरचा जीना चढताना मला त्रास व्हायचा. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनाला दांडी मारून मी बंगळुरूला गेलो. आणि सटासट 12 किलो वजन कमी करूनच माघारी आलो. आता मी अमिताभ बच्चनसारखा चालतो. बायकोपण म्हणाली बंगळुरूला जाऊन एवढं कमी केलं. मी स्वत:वर प्रेम करून आयुर्वेदीक काढा पिऊन पिऊन चरबी सगळी काढून टाकली आहे, असं काय झाडी, काय डोंगर, काय हाटील फेम शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.
आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यातील महाआरोग्य शिबिरात आमदार शहाजी पाटलांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी आपलं वजन कमी होण्याचं रहस्य सांगितलं. वयामुळे जीने चढता येत नाही. बसता येत नाही. एसटीत चढता येत नाही. नागपूर अधिवेशन सुरू असतानाच एक दिवस विचार केला. शरीराचं काय करायचं? उपचार करायला हवा असं ठरवलं. अधिवेशनाला आठ दिवस उरलेले असतानाच मी बंगळुरूला गेलो. श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात थांबलो. 12 दिवस मी मसाज केला. वनस्पतींचे काढे घेतले. रात्रभर काढा पिऊन सटासट 12 किलो वजन कमी केलं, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
गेली चार पाच महिने सत्तासंघर्षावर कोर्टात सुनावण्या सुरू आहे. कायद्याची बाजू आणि पुरावे पाहिल्यावर आमच्याच बाजूने निकाल लागेल असं आम्हाला वाटतं. दोन तीन दिवस तरी अजून निकालाला येतील, असं त्यांनी सांगितलं. हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची दोन वर्षापासून चर्चा सुरू आहे. ईडीने त्यांना नोटीस दिली. मुश्रीफ यांनी पुरावे दिली. तर ते सुटतील. नाही दिले तर ईडी त्यांच्या नियमाने कारवाई करेल, असं त्यांनी सांगितलं.
शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणात मुका घ्या मुका अशी शेरेबाजी करून संजय राऊत यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. राऊत यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो. त्याची किंमत संजय राऊत यांना चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत ऊर्फ आगलावे यांचे मागील तीन वर्षापासूनचे विधान पाहिले तर उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याची त्यांनी सुपारीच घेतल्यासारखे वाटते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.