रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत मोठी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी झाली आहे. राज ठाकरे हे कालच या सभेसाठी रत्नागिरीला आले आहेत. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेसाठी कोकणातूनच नव्हे तर पुणे आणि मुंबईतूनही मनसेचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. काही कार्यकर्ते दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. मात्र, या सभेपूर्वीच एक दुर्देवी घटना घडली आहे. रत्नागिरीकडे येत असताना एका मनसे सैनिकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी निघालेल्या मनसैनिकांच्या गाडीला रत्नागिरीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मनसेचे दहिसर विभागाचे उप शाखाप्रमुख देवा साळवी यांचे निधन झाले आहे. या अपघातात इतर मनसे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर अस्लयाचं सांगितलं जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच मनसेचे नेते संगमेश्वरला रवाना झाले असून जखमी मनसे सैनिकांना भेटणार आहेत.
आज झालेल्या अपघातात मनसे सैनिकाचा मृत्यू झाल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सकाळी ही दुःखद घटना घडली आहे. या अपघातात एका मनसैनिकाचा मृत्यू झाला आहे. बाकी मनसे सैनिक किरकोळ जखमी आहेत, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
रत्नागिरीतील राज ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोकणात उत्साही वातावरण आहे. सर्वांचं या सभेकडे लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आमचंही या सभेकडे लक्ष लागलं आहे, असं संदीप देशापांडे यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटावर जोरदार टीका केली. शिवसेनेचा इतिहास बघितला तर काही वेगळं होत नाही. हे एक नंबरचे पलटी मास्टर आहेत. जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा लोकांशी का चर्चा केली नाही? किंवा काही सेटलमेंट झाली नसेल म्हणून आंदोलन करायचं. काही मलिदा मिळाला तर मिळाला. राजन साळवी यांची यात गोची झाली. तुम्ही पलटी मारू शकता पण लोक नाही मारू शकत, असा चिमटा त्यांनी काढला.