‘अशोकराव तुमची मजल 2जी, 3जी आणि सोनियाजी…’, देवेंद्र फडणवीस यांची खोचक शब्दांत टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज नांदेडमध्ये सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना काँग्रेसवर निशाणा साधला. फडणवीसांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर यावेळी खोचक शब्दांत टीका केली.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेवेळी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पार पडलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात येवून फडणवीस यांनी चव्हाणांना डिवचलं आहे. “अमित शाह यांची नांदेडला आम्ही सभा ठेवली तर अशोक चव्हाण म्हणाले, त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून ते सभा घेत आहेत. अशोकराव असं नाहीय. आमच्याकडे 9 वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं काम आहे, म्हणून आम्ही सभा घेतोय”, असं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.
“अशोकराव तुमची मजल 2जी, 3जी आणि सोनियाजी याच्यापलीकडे गेलीच नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही. म्हणून तुम्ही सभा घेण्याची हिंमत करत नाहीत. आम्ही बघा अमित शाह यांची सभा घेतली. नजर जाईल तिथपर्यंत जनतेचा महासागर बघायला मिळतोय”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो. तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो, आता काँग्रेसचा कोणताही नेता उठला की म्हणतो महाराष्ट्रात आम्ही कर्नाटक पॅटर्न आणू. कालपर्यंत त्यांना कर्नाटकचं नाव घेतलं तर राग यायचं. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पॅटर्न चालतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावरही टीका केली. “निवडणुका जवळ आल्या की शरद पवार यांचे वक्तव्य सुरु होतात. याआधीच्या दोन निवडणुकांपूर्वी ते एकच म्हणतात की, मोदींची लाट गेलीय. आता आम्हीच निवडून येणार. पण मोदीच जिंकून येतात आणि हे पुन्हा उघडे पडतात. २०१९ मध्ये सर्व विरोधक हातात हात घेऊन उभे राहिले. पण जेवढे नेते त्यांच्या मंचावर होते तेवढ्या जागा ते निवडून आले नाहीत”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
“आता पुन्हा शरद पवार यांनी देशातील हवा बदलत आहे, असा दावा केला. पण मोदीच जिंकून येणार. आमच्यात स्पर्धा आहे. गुजराज, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र भाजपला किती जागा देणार याबाबत आमच्यात स्पर्धा सुरु आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.