‘आम्ही गरीब काय करणार, 12 वर्षानंतर बाळ झालं, पण …’, आईचा सुप्रिया सुळे यांच्यासमोर टाहो
नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सुप्रियाताई यावेळी एका महिलेजवळ आल्या तेव्हा तिने अक्षरश: टाहो फोडला. तिचा आक्रोश सुन्न करणारा आहे.
नांदेड | 5 ऑक्टोबर 2023 : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी एका महिलेला अश्रू अनावर झाले. तिने अक्षरश: टाहू फोडला. तिचा आक्रोश पाहून उपस्थितांचे देखील डोळे पाणावले. सुप्रिया ताई यांनी या महिलेला धीर दिला. पण महिला स्वत:ला सावरण्याचा अवस्थेत नव्हती. तिचा आक्रोश अंगावर काटा आणेल असाच होता. तिने आक्रोश करणं हे स्वभाविक होतं. कारण तिने जन्म दिलेल्या बाळाचा या राक्षसी रुग्णालय प्रशासनाने जीव घेतला.
या महिलेला लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी बाळ झालं होतं. एका बाईच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे कोणता असतो? जेव्हा ती आई होते, आपल्या नवजात बाळाला कुशीत घेते, त्याचा स्पर्श अनुभवते, हा क्षण एका बाईला कधीही विसरता येऊ शकत नाही. कारण ती या क्षणी आई झालेली असते. पण या रुग्णालयाने बाईचं आईपणच हिरावून घेतलं. त्यामुळे सुप्रिया ताई जेव्हा तिच्याजवळ आल्या तेव्हा तिला भावना अनावर झाल्या. तिने टाहो फोडला. प्रचंड आक्रोश केला. आपण गरीब आहोत म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. पण जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष करुन आपल्या बाळाचा जीव घेतला, असं म्हणत महिला रडत होती.
“मी दोन-तीनवेळा सांगायला गेले तेव्हा बघितलं. लक्ष देत नव्हते. रात्रीच्या टाईमलादेखील बघत नव्हते. आम्ही काय करु? आमच्याने काय होणार आहे? डॉक्टर पैसेवाले आहेत. आम्ही गरीब आहोत. आमच्याकडून काय होणार आहे? आम्हाला वाटतं, तुमच्याकडून जे होतं ते करा. 12 वर्षांनी बाळ झालं होतं. माझ्या बाळाचा जीव घेतला. माझ्या बाळावर सर्व दुर्लक्ष केलं. मला म्हणतात, तुम्हाला काय करायचं ते करा. आमच्याने काय होणार आहे? आम्ही गरीब आहोत ना? आमच्याकडे पैसे नाहीत. ते श्रीमंत आहेत. 12 वर्षांनंतर मला बाळ झालं. त्यांनी जीव घेतला माझ्या बाळाचा. मला 12 वर्षांनी बाळ झालं. मी कशी शांत राहू?”, असा आक्रोश महिला करत होती.
नेमकं प्रकरण काय?
नांदेड जिल्हा रुग्णालयात अतिशय भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप करण्यात येतोय. हा आरोप जवळपास खराच असल्या सारख्या घडामोडी बघायला मिळत आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं अक्षरश: तांडव सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये 12 नवजात बाळांचा समावेश होता. विशेष म्हणजे मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत.
या रुग्णालयातील मृतकांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यांनी रुग्णालयाच्या नातेवाईकांची आज भेट घेतली. यावेळी महिलेला अश्रू अनावर झाले. तिने प्रचंड आक्रोश केला. महिलेचा हा आक्रोश अतिशय सुन्न करणार आहे.