Nanded Doctor: रुग्णांचा त्रास समजून घेण्यासाठी त्यांनी केली सेल्फ एंडोस्कोपी, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
रुग्णांचा त्रास समजून घेण्यासाठी आणि त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी नांदेड येथील डॉक्टरांनी सेल्फ एंडोस्कोपीचा प्रयोग केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजतोय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंदही करण्यात आलीय.
नांदेडः येथील गॅलेक्सी पचनसंस्था आणि यकृतविकार रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन जोशी हे मागील अनेक वर्षांपासून पचनसंस्थेच्या विकारांवर उपचार करतात. पचनसंस्था आणि आतड्यांच्या रुग्णांसाठी त्यांनी अविरत सेवा पुरवली आहे. हे उपचार करताना येणाऱ्या अनुभवांतून आणखी शिकत राहण्याची प्रेरणा घेत त्यांनी नवा प्रयोग केला. एंडोस्कोपी करताना रुग्णाला किती त्रास होतो, तो त्रास कशा प्रकारे होतो आणि कसा टाळता येईल, या सगळ्यांची उत्तरे मिळण्यासाठी त्यांनी सेल्फ एंडोस्कोपीच केली.
तोंडावाटे केली स्वतःचीच एंडोस्कोपी
नांदेड येथील गॅलेक्सी पचनसंस्था आमि यकृतविकार रुग्णालयाचे संचाक डॉ. नितीन जोशी यांनी 17 ऑक्टोबर 2018 रोजी स्वतःचीच एंडोस्कोपी केली. ही तोंडावाटे केली जाणारी आतड्यांची तपासणी कोणतीही भूल न घेता केली होती. या घटनेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आल्याने नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला .
सेल्फ एंडोस्कोपीचा उद्देश काय?
डॉ. नितीन जोशी म्हणतात, बहुतांश वेळा रुग्ण एंडोस्कोपी करण्याआधीच घाबरलेले असतात किंवा कुणाच्या तरी ऐकीव अनुभवावरून अस्वस्थ असतात. साधारणपणे दोन ते तीन मिनिटांची ही प्रक्रिया असते. पण तेवढ्यासाठी रुग्ण भूल देण्याची विनंती करतात. रुग्णांना विश्वासात घेऊन, एंडोस्कोपी गेल्यास गरजवंतांची पैशांची बचत होईल. तसेच भूल दिल्याने उद्भवणारी गुंतागुंतही कमी होईल, या सर्व गोष्टी अधिक ठामपणे समजावून सांगण्यासाठी डॉ. नितीन जोशी यांनी स्वतःची एंडोस्कोपी करून हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारीत केला.
तीन वर्षानंतर जागतिक स्तरावर नोंद
तब्बल तीन वर्षे 2 महिने आणि 10 दिवसांनंतर 27 डिसेंबर 2021 रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने या अतिविशिष्ट प्रयत्नाची नोंद घेतली. भारतातील व्यक्ती किंवा संस्थांनी केलेल्या अतिविशिष्ट घटनांची नोंद घेणाऱ्या या संस्थेने डॉ. नितीन जोशी यांच्या सेल्फ एंडोस्कोपीची नोंद घेत त्यांना प्रमाणपत्र दिले. तसेच 2023 च्या पुस्तकार नोंद ठेवण्याचा संदेश पाठवला.
जगात असे दोनच प्रयोग
जगात सेल्फ एंडोस्कोपीचे असे प्रयोग दोन वेळाच झाले असल्याची नोंद आहे. हे तपासून पाहण्यासाठी त्यांनी भारतातील एंडोस्कोपी क्षेत्रातील इतर वरिष्ठ तज्ज्ञांची मते विचारात घेतली. डॉ. नितीन यांनी अशा प्रकारचा प्रयोग करून भारतीय एंडोस्कोपी क्षेत्रात पहिला आणि वेगळा इतिहास रचला आहे.
इतर बातम्या-