Nandurbar | काळजाचा ठोका चुकवणारे थरारनाट्य; मंडळ अधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
यापूर्वीही राज्यात वाळू तस्कारांविरोधात कारवाई करायला गेल्यानंतर तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर आणि इतर वाहने घालण्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत.
नंदुरबारः नंदुरबारमध्ये काळजाचा ठोका चुकवणारे थरारनाट्य घडले. वाळू तस्करांनी चक्क मंडळ अधिकारी आणि तलाठाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे महसूल विभागाचे धाबे दणाणले आहे. अशा गुन्हेगारी व्यक्तींवर कारवाया करायच्या तरी कशा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही राज्यात वाळू तस्कारांविरोधात कारवाई करायला गेल्यानंतर तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर आणि इतर वाहने घालण्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वाळू तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
नेमके प्रकरण काय?
तळोदा तालुक्यात नळगव्हाण गावातील वाल्हेरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना मिळाली होती. त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी धाव घेतली. मात्र, वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या अंगावरच थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भेदरलेल्या कोतवालाने ट्रॅक्टरमागे धाव चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर ट्रॅक्टरमधील वाळू ट्रॉली उचकवून सांडून देत माफियांनी घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुजरातमधून ट्रॅक्टर जप्त केल्याचे समजते. मात्र, याप्रकरणातल्या सूत्रधारांवर कारवाई कधी होणार, असा सवाल महसूल कर्मचारी विचारत आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी वाळू तस्करांनी नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर प्राणघात हल्ला केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली होती.
पुण्यातही वाळू तस्करी
दुसरीकडे पुण्यात गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी वाळूची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी मिळेल तिथे, मिळेल त्या पद्धतीने वाळूचा उपसा केला जात आहे. बेकायदेशीर रित्या उपसल्या जाणाऱ्या वाळू तस्करांवर पोलीस व वाहतूक विभाग कारवाई करतांना दिसून येत आहे. गेल्यावर्षात प्रशासनाने अशा 10 वाळू तस्करांवर कारवाया केल्या आहेत. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशन सक्रिय झाले असून पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शहरातील विविध गृह प्रकल्पांसाठी इतर जिल्ह्यातूनही बेकायदेशीररित्या वाळूचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारे बेकायदेशीररीत्या विना परवाना वाळूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी करवाई सुरू केली आहे.
इतर बातम्याः
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली