Eknath Khadse : अजितदादा भाजपमध्ये जाणार? एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी दादांसोबत बोललो…
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचा दावा केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने राज्यातील सत्ताधारी आमदार नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या कालपासून चर्चा आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी मात्र आपण कुठेच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. माझं अजित पवार यांच्याशी बोलणं झालंय. दादा कुठेही जाणार नाही. त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांच्या या विधानानेअजितदादा भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ खडसे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अजितदादा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाहीत. त्यांना बदनाम करण्यासाठी वारंवार या बातम्या दिल्या जातात, असं एकनाथ खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी बाबरी आंदोलनातील शिवसैनिकांच्या सहभागावरही भाष्य केलं. बाबरी आंदोलनात शिवसैनिक कमी संख्येने होते. बाबरीचा ढाचा आम्ही पाडला असं म्हणण्याची हिंमत तेव्हा कोणी दाखवली नाही. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांकडे बोट दाखवणं योग्य नाही, असा टोला खडसे यांनी लगावला.
शिवसेनेचा सहभाग होता
बाबरी आंदोलनातील शिवसैनिकांच्या सहभागाबाबतचं चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केले ते अर्धवट आहे. त्यांनी असे करायला नको होते. मी त्या ठिकाणी हजर होतो, तुरुंगातही होतो. शिवसेनेचा सहभाग कमी होता पण नव्हता असे नाही, असंही ते म्हणाले.
विस्तार होणार नाही
सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. नवीन मंत्र्यांना वाव नाही. महिलांना मंत्रिपद नाही. पुढच्यावेळीही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असं बच्चू कडू यांना वाटत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
आम्हाला त्रास सुरू
ज्यांच्यावर ईडी, सीबीआयचा दबाव टाकून भाजपमध्ये गेले ते आता वॉशिंग मशीन टाकून पवित्र झाले. जो भाजप विरोधात बोलले त्याच्यावर यंत्रणेचा त्रास सुरू होतो. अजितदादा, मी आहे, अनेक नेते आहेत त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, असा दावाही त्यांनी केला.