पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ? शंभुराज देसाई यांच्या भेटीचं कारण काय?; गोपिचंद पडळकर यांचा दावा काय?
भाजप कायम निवडणुकीच्या तयारीत असते. मोदींनी विरोधकांना दुबळे न समजता कामाला लागा असा संदेश दिला आहे. अगदी थोड्या मतांनी बारामतीची जागा गेली.
कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. पार्थ पवार आणि देसाई यांच्या भेटीवर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी अत्यंत सूचक विधान केलं आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असावी, असं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल.
हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ही भेट झाली असावी, असं गोपिचंद पडळकर म्हणाले. पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल. पण भेट का घेतली? काय चर्चा झाली हे मला माहीत नाही, अशी सारवासारवही त्यांनी केली.
आम्ही यावेळी बारामतीसह सर्व जागा जिंकू. आम्ही निवडणूक आली की कामाला लागत नाही. आमची तयारी अगोदर पासून सुरू असते, असं पडळकर यांनी सांगितलं. गेल्या 8 वर्षात विकास करण्यात मोदी सरकार अग्रेसर आहे. नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला दुसरा कोणता रंग देऊ नये. विकासकामांचा शुभारंभ आज होतोय. सकारात्मक बदल होतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप कायम निवडणुकीच्या तयारीत असते. मोदींनी विरोधकांना दुबळे न समजता कामाला लागा असा संदेश दिला आहे. अगदी थोड्या मतांनी बारामतीची जागा गेली. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 48 जागा जिंकेल असं ते म्हणाले.
दरम्यान, पार्थ पवार यांनी आज शंभुराज देसाई यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. या भेटीबाबत पार्थ पवार यांनी काहीही भाष्य केलं नाही. त्यातच गोपिचंद पडळकर यांनी नवा बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात नवीच चर्चा रंगली आहे.