सातारा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची मध्यंतरी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी सूचक विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे राजकीय प्रश्नावर स्पष्टपणे बोलत नाहीत. संदिग्ध उत्तरे देत आहेत. खासकरून लोकसभा निवडणूक लढवणार का? लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार? तुम्ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य आहे? असे प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हे हे संदिग्ध उत्तरे देत आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार की नाही? तसेच भाजपमधून की राष्ट्रवादीतून लढवणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी संदिग्ध उत्तर दिले आहे. आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं? असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी अत्यंत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. त्यावर त्यांना प्रश्न केला असता त्यांनी उलटा माध्यमांना प्रश्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं याचा अर्थ भाजपमधून ऑफर आहे असा होतो का? असा सवाल त्यांनी माध्यमांना केला. कराड येथे होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आले असता खासदार अमोल कोल्हे माध्यमांशी बोलत होते.
छत्रपती संभाजी राजेंचा धगधगता इतिहास नव्या पिढीला समजण्यासाठी कराडमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिल ते 3 मे दरम्यान हे महानाट्य कराडमध्ये होणार आहे, असं कोल्हे यांनी सांगितलं.
दरम्यान, यापूर्वीही अमोल कोल्हे यांनी असेच विधान केले होते. आभाळ पाहून, वारं पाहून, मगच नांगरायला घ्यायचं असतं, असं त्यांनी म्हटलं होतं. तेव्हाही कोल्हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कोल्हे यांनी आता पुन्हा तसेच विधान केलं आहे. कोल्हे यांनी दुसऱ्यांदा तेच विधान केल्याने त्यांच्या मनात काय चाललं आहे? असा सवाल केला जात आहे.