Nitesh Rane: औरंगजेबाची कबर हवीच कशाला?; नितेश राणेंसह मराठा क्रांती मोर्चाचाही आक्रमक
Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीपुढे माथे टेकवणाऱ्यांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांचा ज्यांनी छळ करून मारलं त्यांची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?,
कुडाळ: औरंगजेबाच्या कबरीला (aurangzeb tomb) मनसेने आक्षेप घेतल्यानंतर या कबरीला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. तसेच ही कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यावरून पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद केली जात आहे. पण ही कबर हवीच कशाला? असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा देता कामा नये, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करा आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी मराठा मोर्चाने केली आहे.
नितेश राणे यांनी मीडियाशी बोलताना औरंगजेबाच्या कबरीला विरोध केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे माथे टेकवणाऱ्यांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांचा ज्यांनी छळ करून मारलं त्यांची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?, असा सवाल नितेश राणे यांनी केला. पुरातत्त्व खातं विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीला प्रतिसाद देत नाही. परंतु काही अघटीत घडू नये म्हणून औरंगजेबाची कबर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवतात. कशी माणसे या खात्यात आहे बघा, असा संताप राणे यांनी व्यक्त केला आहे.
तर मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरेल
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनीही पुरातत्त्व विभाग आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. औरंगजेबाची कबर कायमस्वरूपी बंद करा. त्याचप्रमाणे ओवैसींना महाराष्ट्रात येण्याची बंदी घाला, महाराष्ट्रात मुघलांची नाटके खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा पाटील यांनी दिला. औरंगाबादमधील औरंगजेबाची कबर पर्यटनाचा विषय नसून ही कबर कायमस्वरूपी बंद करावी. अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरून औरंगजेबाची कबर कायमस्वरूपी बंद करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
हा तर निर्लज्जपणाचा कळस
औरंगजेबाच्या कबरीला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवली? हा निर्लज्जपणाचा कळस आहे? शिवरायांच्या स्वराज्यावर चालून येणाऱ्या, संभाजी महाराजांचा अतोनात हाल करणाऱ्याच्या थडग्याला सुरक्षा? लाज वाटली पाहिजे सरकारला हा निर्णय घेताना. शिव-शंभू प्रेमी या हिंदूद्वेषी सरकारला धडा शिकवा, अशा शब्दात मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.