सिंधुदुर्गाची माती आहे, इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो; निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत दणदणीत विजय मिळाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही सिंधुदुर्गाची माती आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत दणदणीत विजय मिळाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही सिंधुदुर्गाची माती आहे. इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांचे बंधू आणि भाजप आमदार नितेश राणे गायब आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल लागत आहे. अशावेळी निलेश राणे यांनी आजच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. या ट्विटमधून राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अख्खी चिवसेना ओकत होती. पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल, असं वर्गणी चोरांना वाटतं होतं. पण ही सिंधुदुर्गाची माती आहे, इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नितेश राणे नॉट रिचेबल
दरम्यान, संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यापासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. गेल्या आठवड्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, ते पोलिसांना सापडत नाहीत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत तुम्हाला नितेशचा पत्ता का सांगू, असं विधान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी राणेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी नोटीस घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अखेर त्यांच्या घरावर नोटीस चिटकवली होती.
अंतरीम जामीन नाहीच
दरम्यान, दोन दिवसाच्या सुनावणी नंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अंतरीम जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांचे वकील आज मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
जिल्हा बँकेवर वर्चस्व
दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागला आहे. या 19 जागांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
विजय कुणाचा?
भाजपचे प्रकाश बोडस विजयी भाजपचे दिलीप रावराणे विजयी भाजपचे मनीष दळवी विजयी भाजपचे महेश सारंग विजयी भाजपचे अतुल काळसेकर विजयी भाजपचे विठ्ठल देसाई विजयी भाजपचे बाबा परब विजयी भाजपचे समीर सावंत विजयी भाजपचे गजानन गावडे विजयी भाजपचे प्रज्ञा ढवण विजयी भाजपचे रवींद्र मडगावकर विजयी
महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी महाविकास आघाडीच्या नीता राणे विजयी महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी विजयी महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विजयी
धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 31, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या