बुलढाणा : लग्न म्हटलं तर धांगडधिंगा हा आलाच. डीजे, बँड नसेल तर ते लग्न कसले. आजच्या काळातील लग्न डीजे आणि बँडशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. डीजेच्या तालावर वाकडेतिकडे कंबर करत नाचणारी तरुण-तरुणी लग्नाचा माहौल तयार करतात. लग्नाच्या या समारंभात मग घरची वयोवृद्ध मंडळीही तालधरत लग्नसोहळ्यात मज्जा आणतात. पण बुलढाण्यात एक अनोखच लग्न पार पडलं. या लग्नात ना बँड होता ना डीजे. फक्त टाळ आणि मृदुंग वाजवत वरात काढण्यात आली. पोरी नवरदेवाच्या वरातीसमोर फुगड्या घालत होत्या. ही अनोखी वरात पाहून सर्वांनाच कुतुहूल वाटलं.
अलिकडच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रूपयांचे बॅन्ड, हजारोंचे डीजे याची क्रेज वाढत असताना त्याला अपवाद ठरावा असा लग्न सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील आव्हा येथे पार पडला. डीजे नाही, बॅन्ड नाही, तर चक्क वारकरी संप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात, शिवकिर्तनात फुगडीच्या मनमोहक आनंदात, ज्येष्ठ नागरिकांच्या भक्तीमय वातावरणात नवरदेवाची वरात काढण्यात आली. ही अनोखी वरात सामाजात एक आदर्श निर्माण करणारी ठरत आहे. डीजेमुळे समाजात एकीकडे चिंता तर दुसरीकडे निर्धास्तपणा अशा परिस्थितीत समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत असताना, त्या प्रश्नावर तोडगा ठरावा असा आगळावेगळा लग्न सोहळा काल मोताळा तालुक्यातील आव्हा येथे पार पडला.
डीजे आणि बँडच्या अवाढव्य खर्चाला या लग्नात फाटा देण्यात आला. डीजे आणि बँडवर नाचल्यानंतर दारूचे घोट घशात ओतण्याच्या प्रकारालाही या लग्नात आळा घालण्यात आला. मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील जगन्नाथ केशव संबारे यांचे सुपुत्र गणेश जगन्नाथ संबारे तसेच मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ओंकार मधुकर घोंगटे यांची सुकन्या निकिता ओंकार घोंगटे यांचा विवाह सोहळा आव्हा येथे पार पडला. या विवाह सोहळ्या आधी नवरदेवाची टाळ मृदंगाच्या तालात वरात काढण्यात आली. संपूर्ण गावातून वरात फिरुन आल्यानंतर वर आणि वधूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने हे लग्न लावण्यात आलं.
संबारे कुटुंबीयांच्या घरची लग्नाची वरात अशा काही प्रकारे निघेल याचा काही अंदाज गावातील लोकांना नव्हता. नेहमी प्रमाणे गावकरी लग्नासाठी जमले होते. पोर आणि पोरी लग्नात फुलटू डान्स करण्याच्या तयारीत होते. पण वरात सुरू होताच टाळ मृदुंगाचे स्वर कानी पडल्याने नाचावं तर कसं नाचावं असा प्रश्न तरुणतरुणींना पडला. तेवढ्यात काही महिलांनी फुगड्या घालण्यास सुरुवात केली. एव्हाना शिवकीर्तनही सुरू झाला. लग्नाच्या वरातीत टाळ मृदुंगाचा आवाज ऐकून गावकरीही जमा झाले. लग्नाची वरात पाहण्यासाठी अख्खा गाव लोटला होता.