Amit Shah: कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचं खासगीकरण नाही, अमित शहांची ग्वाही
राज्यातील साखर कारखाने सुरू राहील यावर आमचा भर राहील. राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचं खासगीकरण करणार नाही.
प्रवरानगर: राज्यातील साखर कारखाने सुरू राहील यावर आमचा भर राहील. राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचं खासगीकरण करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दिली.
अमित शहा आज प्रवरानगरमध्ये आले होते. यावेळी सहकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही ग्वाही दिली. केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्रासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील साखर कारखान्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. साखर कारखाने सुरू राहील हे आमचं काम राहील. कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचा खासगीकरण होणार नाही यासाठी याचा आम्ही प्रयत्न करू, असं शहा म्हणाले.
सहकार क्षेत्र तोडायला आलो नाही
जे साखर कारखान्याचे संचालक, मॅनेजमेंट राजकीय विचारधारेने आमच्या सोबत नाही त्याची राज्य सरकारने गॅरंटी न देणं किती योग्य आहे. मी इथे आलो तेव्हा अनेकांचे फोन आले. महाराष्ट्रात काय करणार आहात? असं विचारलं गेलं. मी सहकार मंत्री झालो. तेव्हा माझ्यावर अनेक सवाल केले. मी सहकार क्षेत्र तोडायला आलो नाही, जोडायला आलो आहे. पण राज्य सरकारनेही राजकारण बाजूला ठेवून सहकाराला पाहावं. कारखान्याचे संचालक कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, या आधारावर फायनान्स करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
नवं सहकार धोरण आणणार
यावेळी त्यांनी बँका वाचवणार असल्याचंही स्पष्ट केलं. आम्ही बँका वाचवण्यासाठी जे काही करायचं ते करू. बँका वाचवण्यासाठी आता नव्या कमिट्या स्थापन करणार नाही. कमिट्या तयार करून वेळ घालवणार नाही. अनके समित्या बनल्या, अनेक अहवाल आले. अहवाल रद्दीत गेले. कशाचीच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे समितीची गरज नाही. तुमच्यासोबत बसून समस्या समजून त्या मार्गी लावू, असंही त्यांनी सांगितलं. येणाऱ्या काळात नवं सहकार धोरण आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नव्या नेतृत्वाकडे सहकाराची चळवळ द्या
सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं. आज काय झालं? कुठे गेल्या या बँका? घोटाळे का झाले? स्थिती काय आहे? केवळ तीनच बँका उरल्या आहेत. हजारो कोटीचे घोटाळे कसे झाले? हे काय रिझर्व्ह बँकेने केले का? नाही… नाही… रिझर्व्ह बँकेने केले नाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्यासोबत आहे. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करायलाच पाहिजे. नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा दिली तर पुढील 50 वर्ष ही चळवळ टिकून राहील, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Amit Shah: सहकार वाचवण्यासाठी समित्या स्थापन करणार नाही, अमित शहांनी सांगितला नवा प्लान!
Amit Shah: सहकार क्षेत्रातील पक्षपात मूकदर्शक बनून पाहणार नाही; अमित शहांचा इशारा