कोल्हापूर | 25 जुलै 2023 : माणसाचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, असं म्हणतात. कारण जसं पाण्याच्या बुडबुड्याला फार आयुष्य नसतं. बुडबुडा लगेच पाण्यात विरघळून जातो. तशाच घटना या माणसासोबत होताना दिसत आहेत. आपल्यासोबत कधी काय होईल, याचा भरोसाच नाही. कुणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल आणि त्याचं निधन होईल, याचा भरोसा नाही. तर कुणाचा रस्त्याने जाताना अपघातात मृत्यू होईल सांगता येणार नाही. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. एक महिला नाट्यगृहात कार्यक्रमासाठी गेली होती. या दरम्यान ही महिला नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहात गेली पण त्यावेळी एक अतिशय अनपेक्षित अशी घटना घडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. अतिशय मन हेलावणारी ही घटना आहे.
कोल्हापुरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पावसाचा अंदाज पाहता प्रशासन देखील सतर्क झालं आहे. असं असताना कोल्हापुरात आज एक अनपेक्षित दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा हकनाक बळी गेला आहे. संबंधित महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापूरच्या खासबाग परिसरात संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूरचं शाहू खासबाग मैदान हे ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं. या मैदानाची संरक्षण भिंत आज संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या संरक्षण भिंतीला लागून केशवराव भोसले नाट्यगृहाचं स्वच्छतागृह होतं. या स्वच्छतागृहात गेलेल्या दोन महिला या संरक्षण भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्मिशन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून ढिगारा बाजूला सारण्याचं काम तातडीने सुरु करण्यात आलं. अग्निशन दलाच्या जवानांनी पडलेल्या भिंतीचे अवशेष बाजूला केले. या कामासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना थोडा वेळ लागला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांनी जोपर्यंत मलबा बाजूला केला तोपर्यंत उशिर झाला होता. स्वच्छतागृहात गेलेल्या एका महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त केला जातोय. अश्विनी यादव असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मृत महिला कोल्हापुरातील भोसलेवाडी परिसरात वास्तव्यास होती. महिला एका कार्यक्रमासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आली होती. या दरम्यान तिच्यासोबत ही दुर्देवी दुर्घटना घडली.