सिधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरला हलविण्यात येत आहे. डॉक्टरांच्या पथकासह कार्डियाक रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना कोल्हापूरला घेऊन जात आहेत. नितेश यांच्यावर ओरोस येथील रुग्णालयात (oros district hospital) गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. गेल्या तीन दिवसांपासून छातीत दुखू लागल्याची त्यांनी तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र, ओरोस रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने आणि कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता त्यांना कोल्हापूरला (kolhapur) नेलं जात आहे. दरम्यान, नितेश यांच्या या आजारावर शिवसेनेने टीका केली होती. राणे खरोखरच आजारी आहेत की हा राजकीय आजार आहे? असा सवाल शिवसेनेने केला होता.
नितेश राणे यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आज त्यांना ओरोस ग्रामीण रुग्णालयातून कोल्हापूरला नेण्यात येत होतं. कार्डियाक रुग्णवाहिकेतून नितेश यांना घेऊन जात असताना रुग्णवाहिका 40 किलोमीटर अंतरावर तळेरे येथे आल्यावर नितेश यांच्या छातीत अधिकच दुखू लागलं. त्यांनी पोलिसांकडे तशी तक्रार केल्यानंतर तळेरे येथे अचानक वाहनांचा ताफा थांबवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या वाहनात असलेल्या डॉक्टरांनी तात्काळ रुग्णवाहिकेत येऊन नितेश यांना पेन किलरचं औषध दिलं. थोडावेळ रुग्णवाहिका थांबल्यानंतर पुन्हा हा ताफा निघाला. वैभववाडीच्या दिशेने म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने गगनबावडा मार्गे कोल्हापूरला ही नितेश राणे यांना नेण्यात येत आहे. त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पोलिसांच्या ताब्यात असलेले नितेश राणे प्रचंड अशक्त झाले आहेत. ओरोस रुग्णालयातून आज नितेश कोल्हापूरला जाण्यासाठी बाहेर पडले. यावेळी ते अशक्त झाल्याचं दिसून येत होतं. तसेच त्यांना चालताही येत नसल्याचं दिसून येत होतं.
दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत नितेश राणे यांचा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यावर आज निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र, आज सार्वजनिक सुट्टी असल्याने उद्या या प्रकरणावर निकाल येणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच नितेश यांना जामीन मिळणार की नाही? हे सुद्धा उद्याच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रदीप घरत यांनी हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केल्याने त्याला नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. घरत यांना खटला वर्ग कण्याचा अधिकार नाही. कोर्टात बदमाशी सुरू आहे, असा दावा सतीश माने शिंदे यांनी केला होता. तर मी विशेष सरकारी वकील आहे. मी खटला वर्ग करण्यासाठी अर्ज करू शकतो, असा दावा घरत यांनी केला होता. मेरिट ग्राऊंडवर विशेष सरकारी वकिलांचा अर्ज बरखास्त करा. रजिस्टर झालेला नंबर पडलेला अर्ज आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे तुमचा अर्ज अधिकृत नाही. त्यामुळे तो तातडीने फेकून द्या, असं मानेशिंदे म्हणाले होते.
संबंधित बातम्या: