गोविंदबागेत पवारांचं फॅमिली डिनर; बारामतीमध्ये आज पॉवर शो, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटणार
दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये जमत असतात. यंदा हा दिवाळी कार्यक्रम अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीही उपस्थिती लावणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे दुपारी 12 वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत. | Sharad Pawar
बारामती: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असणारे पवार कुटुंबीय दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले आहेत. काल लक्ष्मीपूजनानंतर पवार कुटुंबीयांची मेजवानी पार पडली. यावेळी गोविंदबागेतील हिरवळीवर एकत्रित येत पवार कुटुंबाने खास फोटोसेशन केले. यावेळी प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये जमत असतात. यंदा हा दिवाळी कार्यक्रम अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीही उपस्थिती लावणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे दुपारी 12 वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
पवार कुटुंबीय तपास यंत्रणांच्या रडारवर
गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबातील अनेक सदस्य तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे. पवार कुटुंबीयांशी संबंधित अनेक मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर पवार कुटुंबीयांशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाकडून टाच आणण्यात आल्याचीही चर्चा आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे दिवाळी कार्यक्रम रद्द
गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे बारामतीमधील दिवाळी कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन पवार कुटुंबाने केले होते.
शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले होते. असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त होती.
संबंधित बातम्या:
शिवसेनेच्या वाघिणीचं जंगी स्वागत, रश्मी ठाकरेंकडून डेलकरांचं औक्षण, मातोश्रीचा खास पाहुणचार