चंद्रपुरात रामदेवबाबा सालव्हंट कंपनीमुळे प्रदूषण? MPCB च्या मानकानुसार यंत्रणा बसवल्याची कंपनीची स्पष्टोक्ती
रामदेवबाबा सालव्हंट या कंपनीमुळे वायू प्रदूषणाचा त्रास होत होतोय. ब्रम्हपुरी शहराच्या हद्दीत असलेल्या या कंपनीबाबत तक्रारी आहेत. ब्रम्हपुरी शहराच्या आजूबाजूच्या उदापूर-बोरगाव-झिलबोडी-मालडोंगरी या गावातील लोक त्रस्त आहेत. कंपनीने जर प्रदूषण थांबविले नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय.
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराजवळच्या रामदेवबाबा सालव्हंट (Ramdev Baba Solvent) या कंपनीमुळे वायू प्रदूषणाचा त्रास होत असल्याचा आरोप होतोय. या कंपनीबाबत ब्रम्हपुरी शहर आणि आजूबाजूच्या उदापूर-बोरगाव-झिलबोडी-मालडोंगरी या गावांतील लोकांनी तक्रारी केल्या आहेत. कंपनीने जर प्रदूषण थांबविले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराच्या (Bramhapuri town in Chandrapur district) हद्दीत असलेल्या रामदेवबाबा सालव्हंट या कंपनीमुळे वायू प्रदूषणाचा त्रास होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. या उद्योगात राईस ब्रँन तेल (Rice bran oil) तयार केले जाते. या कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे सर्वत्र तेलाचे डाग पसरतात असा आरोप ब्रम्हपुरी शहर आणि आजूबाजूच्या उदापूर- बोरगाव- झिलबोडी- मालडोंगरी या गावातील लोकांनी केलाय. सोबतच या प्लांटमधून निघणाऱ्या प्रदूषित पाण्याने जवळच असलेल्या नाल्याचं पाणी देखील प्रदूषित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आंदोलनाचा इशारा
काँगेसचे स्थानिक नगरसेवक आणि नियोजन सभापती महेश भर्रे यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. कंपनीने जर प्रदूषण थांबविले नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा महेश भर्रे यांनी दिलाय. उदापूरचे सरपंच प्रभाकर नाकतोडे, हेविना नाकतोडे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रदूषण थांबणार कसे?
दुसरीकडे रामदेवबाबा सॉलव्हंटच्या वतीने हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्यांच्या मते कंपनीकडून प्रदूषणाच्या सर्व मानकांचे पालन वेळोवेळी करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी तपासणी करून MPCB खात्री करुन घेते असेही रामदेवबाबा सॉलव्हंटचे संचालक नीलेश मोहता यांनी सांगितले. एकीकडे स्पष्टपणे दिसणारे प्रदूषण तर दुसरीकडे कंपनीचे दावे यात सामान्य ब्रम्हपुरीकर मात्र प्रदूषणाचा मार सहन करत आहे. याकडे यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.