रायगड: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं विधान केल्याने खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी करणारं पत्रं त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलं होतं. त्यांच्या या पत्राची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
उदयनराजे भोसले यांनी आज राज्यपालांचा निषेध म्हणून रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केलं. सकाळीच त्यांनी रायगडावर जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आत्मक्लेश केला. त्यानंतर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधत आपली भूमिका जाहीर केली.
या सभेनंतर उदयनराजे यांनी मीडियाशी संवाद साधला आणि राष्ट्रपतींनी आपल्या पत्राची दखल घेतली असून त्याचं आपल्याला उत्तर आल्याची माहिती दिली. आजच मला पत्रं आलं. त्यात माझ्या पत्राची दखल घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलं आहे, अशी महत्त्वाची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करणेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले.@rashtrapatibhvn pic.twitter.com/tCurxhhBBV
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 23, 2022
दरम्यान, शिवाजी महाराजांचा सतत अपमान केल्या जात आहे. महाराजांनी जी भूमिका घेतली सर्वधर्मसमभावाची होती. त्यामागे सर्वांनी आपल्या राज्यात मोकळा श्वास घ्यायला हवा हीच महाराजांची भूमिका होती.
लोकशाहीचा ढाचा त्यांनीच खऱ्या अर्थाने निर्माण केला, असं उदयनराजे यांनी भाषणात सांगितलं.
आता आपण सर्वजण प्रतिक्रियावादी झालो आहोत. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या सर्वांसाठी दिलं त्यांचा आज अपमान होत आहे. आता आपण सर्वजण काय गप्प बसणार आहोत का? असा सवालही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी अवमानकार विधान केलं. त्यामुळे मलाच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला वेदना झाल्या आहेत. राज्यपालांचं ते विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.
यापूर्वीही त्यांनी असेच विधान केलं होतं. अशा विधानामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या विधानाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असं उदयनराजे यांनी या पत्रात म्हटलं होतं.