Radhakrishna Vikhe-Patil : काल मुख्यमंत्रीपदाची चर्चा, आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याच्या चौकशीचे आदेश; काय आहे प्रकरण?
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील एका साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे विखे पाटील गोत्यात आले आहेत.
नगर : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची काल मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून जोरदार चर्चा होती. नगरमध्ये तसे बॅनरही लागले होते. त्यामुळे विखे पाटील हे मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा रंगली होती. शिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याची अचानक नगरमध्ये पोस्टर्स लागण्याचे कारण काय? असा सवालही केला जात होता. विखे-पाटील यांच्या पोस्टरमुळे काल राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं असतानाच आज एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच गोत्यात आले आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना कर्जमाफी प्रकरणावर प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरूण कडू यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणाची न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करुन चौकशी करावी अशी मागणी अरुण कडू यांनी केली होती. त्यांच्या या मागणीची राहाता न्यायालयाने दखल घेतली आहे. विखे पाटील कारखाना कर्जमाफी प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं कडू यांनी सांगितलं.
कोर्टाकडून आदेश
2004 साली शेतक-यांच्या बेसल डोसच्या नावाखाली बँकाकडून 5 कोटी 76 लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र चुकीच्या पद्धतीने शासनाच्या कर्ज माफी योजनेत बसवून त्याचा फायदा घेतला गेला. या कर्जावरील पाच कोटी रूपये व्याजेपोटी कारखाना सभासद आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत आम्ही कोर्टात धाव घेतली होती. त्यावर राहाता न्यायालयाने गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचो विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आहे. त्यामुळे सरळ स्वभावाच्या माणसाचा बळी घेतला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ नये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात दिवसभर विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाचीच चर्चा रंगली होती. मात्र, विखे पाटील यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगत कुणाचं तरी हे षडयंत्र आहे, असा दावा केला होता.
राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठ प्रस्थ आहे. राज्याचे राजकारणातही त्यांच नाव आघाडीवर आहे. काँग्रेसमध्ये असताना परिवहन, कृषी आणि पणन, विधी आणि न्याय तसेच शालेय शिक्षणमंत्री अशी विविध मंत्रीपदे त्यांनी भूषवली आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने ते सातव्यांदा निवडून आले आहेत.